उदगावच्या युवकाचा अलाहाबादमध्ये छळ
By Admin | Updated: January 24, 2015 00:08 IST2015-01-24T00:00:50+5:302015-01-24T00:08:21+5:30
नातेवाइकांकडूनच मारहाण : अंगावर अॅसिड टाकण्याचा प्रकार उघडकीस

उदगावच्या युवकाचा अलाहाबादमध्ये छळ
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील उदगाव येथील १६ वर्षीय युवकाला नातेवाइकांनी अलाहाबाद (उत्तर प्रदेश) येथे कामाला नेऊन कामात चूक झाल्यास अंगावर अॅसिड टाकून मारहाण करून छळ केल्याची घटना आज, शुक्रवारी उघडकीस आली. सूरज बंडू गायकवाड (रा. उदगाव, ता. शिरोळ) असे युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे उदगावमध्ये खळबळ उडाली आहे.
उदगाव येथे गायकवाड यांच्या कुटुंबात सूरजची आई सुवर्णा, भाऊ राजेंद्र असा परिवार आहे; तर दोन वर्षापूर्वी वडील बंडू गायकवाड यांचे निधन झाले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिल्याने भाऊ राजेंद्र मिळेल ते काम करतो. गायकवाड यांचे अलाहाबाद येथे नातेवाईक आहेत.
त्यांचा सोन्या-चांदीचा व्यवसाय आहे. या व्यवसायात काम करण्यासाठी त्यांनी दीड वर्षापूर्वी सूरजला नेले होते. त्याठिकाणी दिवसभर सोन्या-चांदीच्या आटणीवर सूरज काम करीत होता. दरम्यान, दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राजेंद्र अलाहाबादला फोन करायचा. मात्र, नातेवाईक सर्वकाही व्यवस्थित असल्याचे सांगत असत.
त्यामुळे सूरजची खरी वस्तुस्थिती घरच्यांना समजून येत नव्हती. या काळात त्याला काठीने मारहाण, एवढेच नव्हे तर अंगावर अॅसिड टाकले जात होते. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून झाडू आणण्यासाठी म्हणून तो घराबाहेर पडला, तो थेट आज सकाळी उदगावमध्ये पोहोचला आणि झालेला प्रकार त्याने घरच्यांना कथन केला. (प्रतिनिधी)