केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:00 IST2025-11-03T17:57:30+5:302025-11-03T18:00:41+5:30
मणक्यांचा खुळखुळा, तरी यंत्रणा ढिम्म

केंद्राकडे बोट कशाला...घरला पाठवा ठेकेदाराला; राष्ट्रीय महामार्ग लोकांचा जीव घेण्यासाठी आहे का?
शरद यादव
कोल्हापूर : राज्य रस्ते विकास महामंडळाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे सहापदरीचे काम वर्ग झाल्यानंतर कामाला गती येण्याऐवजी रेंगाळलेच आहे. रोज तरणीताठी मुले धडकून जीव गमावत आहेत. याबाबत नेत्यांना विचारले की हे काम केंद्राच्या अखत्यारीत येते एवढे एकच कॅसेट लावले जाते. केंद्र काय मंगळ ग्रहावर असल्याने संपर्क होत नाही का, इथं रोज माणसं मरायला लागल्यात अन् ठेकेदार बदलता येत नाही म्हणून जर मणके मोडण्याचा खेळ सुरू असेल तर या खेळाच्या गदीत पाणी ओतण्यासाठी कोल्हापूरकर सक्षम असल्याचा सूर व्यक्त होत आहे.
कागलच्या थोडे पुढे गेले की कर्नाटक सुरू होते. तेथे सहापदरीचे काम वेगवान असल्याचे पाहायला मिळते. अनेक ठिकाणी काम पूर्णही झाले असल्याचे सांगण्यात येते. मग कोल्हापूरच्या वाटणीलाच ही रखडपट्टी का, याचा जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. या कामावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे नियत्रंण आहे. याचे कार्यालयही उजळाईवाडी येथे आहे. ३ वर्षे झाली काम जराही पुढे सरकत नसेल व हे विचारण्यासाठी संबंधित अधिकारी फोनही घेण्याची तसदी घेत नसतील तर केंद्राने हा विभाग केवळ पगार घेण्यासाठी सुरू केला आहे का, असा सवाल केला जात आहे.
पक्षप्रवेश, राजकीय जोडण्यात नेते मग्न
जिल्ह्यात बडे नेते पक्षप्रवेश करून घेण्यात, पालिका व झेडपी निवडणुकीच्या जोडण्या करण्यात मग्न आहेत.पंरतू जिल्ह्यातील जनता जीवन मरणाचा संघर्ष करत असल्याचे त्यांना काहीच कसे वाटत नाही,याचेच आर्श्चय वाटते. अजून वर्षभराने होणाऱ्या एका निवडणुकीसाठी श्रावणबाळ गणित घालत आहेत. पण इकडे वृद्धांना हायवेवरून प्रवास केला की अंथरूण धरावे लागते, त्यांची यात्रा सुखकर कोण करणार, हा प्रश्न आहेच.
गडकरींचे काम प्रामाणिक, पण खालची यंत्रणा ढिसाळ
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अनेक वेळा आपल्या भाषणात रस्त्यांचे जाळे देशभर विणून आपल्या मंत्रालयाने कसा विकास केला हे सांगतात. त्यांचे अमोघ वकृत्व ऐकून भारतातील रस्ते आता सिंगापूरच्या तोडीचे होणार असल्याचा भास होताे. पण प्रत्यक्षात गाडी घेवून हायवेला लागले की चिखलगुठ्ठा स्पर्धेत भाग घेतल्यासारखी अवस्था वाहनचालकाची होत असल्याचा अनुभव आहे.
विरोधकांनी हायवे ठप्प करावा
जिल्ह्यातील विरोधक हायवेच्या कामावर आंदोलन करताना दिसतात. परंतु तासभर आंदोलन करून हा प्रश्न सुटणार नाही. एक पूर्ण दिवस हायवेवर ठिय्या मारला तरच याची कळ मुंबईपर्यंत लागेल. राष्ट्रीय महामार्ग दोन तास बंद पडला तर मुख्यमंत्री दखल घेतात. एखादा दिवस वाहनचालकांना त्रास झाला तरी होऊ दे, पण केंद्राला दखल घ्यावी लागेल, असा चक्काजाम केल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.
सर्किट बेंच कोल्हापुरात, टोल टोला देणे शक्य
सर्किट बेंच आता कोल्हापुरात झाल्याने याचिका दाखल करण्यासाठी मुंबईला जाण्याची गरज नाही. नांगरल्यासारखा रस्ता असताना आम्ही टोल का द्यावा, यावर याचिका दाखल केली तर काम पूर्ण होईपर्यंत टोलमधून मुक्ती मिळणे सहज शक्य आहे. शहरातील टोल पंचगंगेत बुडवला, ऊस, दुधाचा दर आंदोलन करून पदरात पाडून घेतला, त्या कोल्हापूरकरांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सरळ करण्यास वेळ लागणार नाही. गरज आहे सर्वांनी रस्तावर उतरण्याची.
सहापदरी महामार्ग गेली ३ वर्षे सुरु असून ठिकठिकाणी रस्ता उकरून टाकला आहे. अद्याप २० टक्केसुद्धा काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदाराला महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही टाइमलाइन दिलेली आहे का नाही? जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत वाहनधारकांनी टोल का भरावा? जोपर्यंत कागल ते किणी नाका काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करणे गरजेचे आहे. - अनिल य. जाधव, सचिव, ग्राहक संरक्षण
मी रोज कागल पंचतारांकित एमआयडीसीमध्ये नोकरीला जातो. या रस्त्याची अवस्था बघून पाणंदीसुद्धा कदाचित चांगल्या असतील असं आता वाटायला लागलं आहे. जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आम्ही घरात मागे येईपर्यंत सर्वच काळजीत असतात. हे कोणत्याही लोकप्रतिनिधीला दिसत नाही का? लोकप्रतिनिधींच्या ५० लाखांपासून कोटीपर्यंतच्या गाड्या आहेत. त्यामुळे त्यांना याचा दणका बसत नाही. सर्वच लोकप्रतिनिधींना एकदा दुचाकीने कागल ते पेठ नाका प्रवास करायला लावले पाहिजे, तरच खरे दुखणे कळेल. - ऋषिकेश कमलाकर, भादोले