कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारण्याचा मार्ग मोकळा, कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:11 IST2025-04-02T12:10:15+5:302025-04-02T12:11:31+5:30

कृषी विद्यापीठाला सांगरूळऐवजी पर्यायी जागेच्या अजित पवार यांच्या सूचना

Path cleared to set up IT Hub in Kolhapur, 34 hectares of land of Agricultural University to be transferred | कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारण्याचा मार्ग मोकळा, कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार

कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारण्याचा मार्ग मोकळा, कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार

कोल्हापूर : शेंडापार्क येथे ‘आयटी हब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची ३४ हेक्टर जागा हस्तांतरीत करण्यात येणार असून, कृषी विद्यापीठाला करवीर तालुक्यातील सांगरूळऐवजी पर्यायी जागा म्हणून कागल, पन्हाळा, हातकणंगले, राधानगरी तालुक्यातील ६० ते १०० हेक्टर एकत्रित जागेचा शोध येत्या १० दिवसांत घ्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी मुंबईत आयोजित विशेष बैठकीत दिल्या आहेत. पवार यांच्या या निर्देशांमुळे शेंडापार्क येथे ‘आयटी हब’ निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

‘आयटी हब’ उभारण्यासाठी कृषी विद्यापीठाची जागा घेण्यात येणार असून, बदल्यात सांगरूळ येथील सव्वादोनशे एकर जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु या जागेवरील निर्वनीकरणासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालय आणि वन विभागाच्या परवानग्यांमध्ये बराच काळ जाणार असल्याने आमदार अमल महाडिक यांनी अन्य पर्यायाबाबत निर्णय घेण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांना केली होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार यांनी ही बैठक घेतली.

बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कोल्हापूरचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, उद्योग सचिव डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्याचा आर्थिक विकास आणि रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी कोल्हापुरात ‘आयटी हब’ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. शेंडापार्क येथील कृषी विद्यापीठाची जागा पूर्वी शहराबाहेर होती ती आता शहराच्या मध्यवर्ती भागात आली आहे. ‘आयटी हब’सारख्या उद्योगासाठी शहरातील जागा आवश्यक असते. कृषी संशोधनासाठी शहराबाहेरील जागाही उपयोगात आणता येईल.

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या मान्यतेने येत्या दहा दिवसांत पर्यायी जागा अंतिम करावी. त्या जागेच्या हस्तांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात येईल.

कोल्हापुरातील आयटी पार्कचा महत्त्वपूर्ण प्रश्न मार्गी लावण्यात यश आले, याचा मनस्वी आनंद आहे. जिल्हाधिकारी आणि संपूर्ण जिल्हा प्रशासनाने यासाठी केलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांबद्दल त्यांचे आभार. कृषी विभागाला द्यावयाच्या पर्यायी जागेसंदर्भातही लवकरच निर्णय होऊन आयटी पार्कच्या कामाला सुरुवात होईल, याची खात्री आहे. - आमदार अमल महाडिक

Web Title: Path cleared to set up IT Hub in Kolhapur, 34 hectares of land of Agricultural University to be transferred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.