प्रवाशाची चार लाखांची रोकड विसरली, कोल्हापुरातील रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली; पोलिसांकडून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 12:15 IST2025-11-13T12:13:17+5:302025-11-13T12:15:22+5:30
फुकटचे पैसे आम्हाला नकोत

प्रवाशाची चार लाखांची रोकड विसरली, कोल्हापुरातील रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे परत केली; पोलिसांकडून कौतुक
कोल्हापूर : तब्बल चार लाखांची रोकड असलेली पिशवी सापडल्यास ती आपल्याकडेच ठेवण्याचा मोह कोणालाही झाला असता. पण, लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणारे रिक्षाचालक शेखर रामचंद्र जाधव (वय ५९) यांनी रिक्षात प्रवाशाने विसरलेली चार लाखांची रोकड काही क्षणात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात जमा केली.
विसरलेले पैसे परत मिळाल्याने प्रवासी अथर्व नारायण पुजारी (रा. नृसिंहवाडी, ता. शिरोळ) यांनी रिक्षाचालकाचे आभार मानले, तर पोलिसांनी सत्कार करून रिक्षाचालक जाधव यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. ही घटना मंगळवारी (दि. ११) सायंकाळी घडली.
जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नृसिंहवाडीत राहणारे अथर्व पुजारी कामानिमित्त कोल्हापुरात आले होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात ते एका रिक्षात (एमएच ०९ जी ८०२५) बसून महाद्वारला उतरले. रिक्षाचे भाडे देऊन ते निघून गेले. मात्र, त्यांची पिशवी रिक्षातच विसरली.
काही अंतर पुढे गेल्यानंतर रिक्षाचालक शेखर जाधव यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पिशवी उघडून बघितले, तर त्यात नोटांचे बंडल होते. त्यांनी मागे फिरून प्रवाशाचा शोध घेतला. मात्र, ते सापडले नाहीत. तशीच रिक्षा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात घेऊन त्यांनी रोकड पोलिसांकडे जमा केली.
त्यानंतर दोन तासांत प्रवासी पुजारी हे रोकड रिक्षात विसरल्याची तक्रार द्यायला जुना राजवाडा पोलिस ठाण्यात पोहोचले. तिथे रोकड सुरक्षित असल्याचे समजताच त्यांचा जीव भांड्यात पडला. रिक्षाचालक जाधव यांच्या प्रामाणिकपणाबद्दल पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
फुकटचे पैसे आम्हाला नकोत
शेखर जाधव हे गेल्या ३० वर्षांपासून शहरात रिक्षा चालवतात. यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. पत्नी आणि दोन मुलांसह ते लक्षतीर्थ वसाहत येथील घरात राहतात. त्यांचा एक मुलगा खासगी कंपनीत नोकरी करतो, तर दुसरा मुलगा भाड्याच्या जागेत दुकान चालवतो. रिक्षात विसरलेले पैसे परत केल्याबद्दल विचारणा केली असता, त्यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली. 'आमच्या कष्टाने पुरेसे पैसे मिळतात. यातच आम्ही समाधानी आहे. आम्हाला कुणाचे फुकटचे पैसे नकोत,' असे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी त्यांचा प्रामाणिकपणाचे कौतुक केले.