कोल्हापूर जिल्ह्यात पाडळी खुर्द, बानगे दोन नवे जिल्हा परिषद मतदारसंघ; आजरा मतदारसंघ रद्दच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:26 IST2025-07-15T19:26:05+5:302025-07-15T19:26:46+5:30

गावांच्या अदलाबदलीने काहींची सोय, तर काहींना झटका

Padli Khurd, Bange two new Zilla Parishad constituencies in Kolhapur district Ajra constituency cancelled | कोल्हापूर जिल्ह्यात पाडळी खुर्द, बानगे दोन नवे जिल्हा परिषद मतदारसंघ; आजरा मतदारसंघ रद्दच

कोल्हापूर जिल्ह्यात पाडळी खुर्द, बानगे दोन नवे जिल्हा परिषद मतदारसंघ; आजरा मतदारसंघ रद्दच

कोल्हापूर : करवीर तालुक्यामध्ये पाडळी खुर्द आणि कागल तालुक्यात बानगे या दोन नव्या जिल्हा परिषद मतदारसंघांची भर पडली आहे. तर आजरा जिल्हा परिषद मतदारसंघ रद्द झाला आहे. जिल्ह्यातील ६८ गट आणि गणांची प्रारूप रचना जिल्हा प्रशासनाने सोमवारी जाहीर केली. अनेक तालुक्यांमध्ये गावांची अदलाबदल मोठ्या प्रमाणावर झाली असून त्याचा काहींना फायदा तर काहींना तोटा होणार आहे. २१ जुलैपर्यंत या प्रारूप रचनेवर हरकती घेता येणार आहेत.

करवीरमध्ये सर्वाधिक १२ जिल्हा परिषद गट व २४ पंचायत समिती गणांची निर्मिती झालेली आहे. पाडळी खुर्द हा नवीन जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण झाला आहे. तर पाडळी खुर्द आणि शिरोली दुमाला हे दोन नवीन गण तयार झाले आहेत. प्रभाग रचना करताना लोकसंख्येला प्राधान्य दिल्याने भौगोलिक रचनेकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक इच्छुकांची राजकीय गैरसोय होणार आहे.

शिरोळमध्ये नाव बदलून यड्राव गट

शिरोळमध्ये मतदारसंघ तितकेच राहिले आहेत. मात्र नाव बदलून यड्राव जिल्हा परिषद आणि चिपरी पंचायत समिती गण अस्तित्वात आला आहे. दानोळी गटातील चिपरी गाव नांदणी गटाला तर उदगाव गटातील संभाजीपूर गाव नांदणी गटाला जोडण्यात आले आहे. अर्जुनवाड, गणेशवाडी, आलास पंचायत समिती मतदारसंघात फारसा बदल झालेला नाही.

चंदगडच्या रचनेत मोठा बदल

गेल्यावेळच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या रचनेत चंदगड तालुक्यात मोठा बदल झाला आहे. चंदगडमध्ये नगरपंचायत झाल्याने चंदगड, माणगाव, तुडये, तुर्केवाडीऐवजी अडकूर, माणगाव, कुदनूर व तुडये गट तर चंदगड, अडकूर, माणगाव, कुदनूर, तुर्केवाडी, कालकुंद्री, तुडये, नांदवडे पंचायत समिती गणात बदल हाेऊन चंदगड, कालकुंद्री, नांदवडे यांच्याऐवजी गवसे, कोवाड, हेरे असे नवीन गण तयार झाले आहेत.

राधानगरीत बदल नाही

राधानगरी तालुक्यातील गट आणि गणांमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी पूर्वी प्रमाणेच प्रारूप रचना जाहीर झाली आहे. राधानगरी तालुक्यात पाच गट निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये राशिवडे बुद्रुक, कसबा तारळे, कसबा वाळवे, सरवडे आणि राधानगरी गटांचा समावेश आहे.

हातकणंगलेत नाव बदलून रूई गट

नव्या प्रारूप आराखड्यानुसार ११ जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघ कायम ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच रुई जिल्हा परिषद आणि माणगाव पंचायत समिती या दोन नवीन मतदारसंघांची नावे बदलून निर्मिती करण्यात आली आहे.पट्टणकोडोली, कबनूर आणि रूकडी गटातील गावे वगळून रूई हा मतदारसंघ करण्यात आला आहे.

कागलमध्ये वाटणीसाठी नेत्यांची सोय

कागल तालुक्यात सहावा बानगे हा नवा जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण झाला आहे. मतदारसंघाची रचना करताना गावांची अदलाबदल झाली आहे. परंतु एक जिल्हा परिषद सदस्य आणि दोन पंचायत समिती सदस्यसंख्या वाढल्याने इच्छुकांत आनंद असून जागांच्या वाटणीसाठी नेत्यांचीही सोय झाल्याचे मानले जाते.

शाहूवाडीमध्ये ‘जैसे थे’

शाहूवाडी तालुक्यात पूर्वीप्रमाणेच गट व गणांची प्रारूप रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार मतदारसंघ व पंचायत समिती गणांचे आठ मतदारसंघ आहे तसे राहिले आहेत.

गडहिंग्लजमध्ये ‘जैसे थे’

गडहिंग्लज तालुक्यातील गट व गणामध्ये कोणताही बदल झाला नाही. २०२२ मध्ये झालेली फेररचना नव्या प्रारूप प्रभाग रचनेतही कायम राहिली. एकूण ५ पैकी गिजवणे गट कागल विधानसभा मतदारसंघात, तर नूल, हलकर्णी, भडगाव व नेसरी हे चार गट चंदगड विधानसभा मतदारसंघात आहेत.

आजऱ्यात विधानसभा बदलून गटात गावे

आजरा जिल्हा परिषद मतदारसंघच रद्द झाल्याने तालुक्यातील प्रारूप रचनेत उलथापालथ झाली आहे. यामध्ये एका विधानसभा मतदारसंघातील गावे दुसऱ्याच विधानसभेला जोडावी लागल्याने तीन विधानसभा मतदारसंघात विभागलेल्या आजरा तालुक्यात या रचनेमुळे गोंधळ उडाला आहे.

भुदरगडमध्ये काहीच बदल नाही

भुदरगड तालुक्यात ४ जिल्हा परिषद आणि ८ पंचायत समिती मतदारसंघाची प्रारूप रचना जाहीर करण्यात आली असून गतवेळेप्रमाणेच रचना आहे. गण आणि गटातील गावांमध्येही काहीही बदल झालेला नाही.

गगनबावडा जैसे थे

गगनबावडा तालुक्यात परिस्थिती जैसे थे राहिली आहे. तिसंगी आणि असळज असे दोन गट असून चार गण आहेत. जरी तालुक्याची लोकसंख्या कमी असली तरीही तालुक्यात किमान दोन गट हवेत या नियमानुसार गगनबावडा तालुक्यात दोन गट जैसे थे ठेवण्यात आले आहेत.

तक्रारींची राज्य पातळीवर दखल

ज्या पद्धतीने गट आणि गणांची रचना झाली आहे ती पाहता महायुतीने यासाठी विशेष परिश्रम घेतल्याचे जाणवते. काही ठिकाणी जाणीवपूर्वक गावे जोडणे किवा विभागणी केल्याची चर्चा जिल्हाभर सुरू होती. परंतु आता आजऱ्यासारखी ज्या मतदारसंघाची अडचण आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्य पातळीवर हालचाली सुरू असल्याचे सांगण्यात आले. यात तथ्य आहे की नाही हे लवकरच समजणार आहे.

Web Title: Padli Khurd, Bange two new Zilla Parishad constituencies in Kolhapur district Ajra constituency cancelled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.