Kolhapur Politics: जसे ‘विलासराव-पी. एन.’तसेच ‘मी आणि राहुल’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना शब्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:21 IST2025-08-26T12:21:08+5:302025-08-26T12:21:52+5:30

‘पी. एन’ गट राष्ट्रवादीत : जोरदार शक्तिप्रदर्शन

P. N. Patil and Vilasrao Deshmukh as well as Me and Rahul says Deputy Chief Minister Ajit Pawar | Kolhapur Politics: जसे ‘विलासराव-पी. एन.’तसेच ‘मी आणि राहुल’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना शब्द 

Kolhapur Politics: जसे ‘विलासराव-पी. एन.’तसेच ‘मी आणि राहुल’; अजित पवार यांचा कार्यकर्त्यांना शब्द 

सडोली (खालसा) : दिवंगत आमदार पी. एन. पाटील व दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची मैत्री व त्यातून निर्माण झालेले सडोली ते बाभूळगावचे ऋणानुबंध सगळ्यांनी अनुभवले. भविष्यात माझे आणि राहुल पाटील यांचे म्हणजे सडोली व काटेवाडीचे नाते महाराष्ट्र अनुभवेल, अशी नि:संदिग्ध ग्वाही उपमुख्यंमत्री अजित पवार यांनी दिली.

सडोली खालसा (ता. करवीर) येथे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील व जिल्हा बँकेचे संचालक राजेश पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील बंधूंनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या गटाची ताकद दाखवून दिली.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राहुल व राजेश यांनी ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला, त्याची जबाबदारी आता माझ्यावर आहे. त्यांना या निर्णयाची चूक वाटणार नाही, याची खात्री देत असतानाच तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते येत्या कालावधीत पूर्ण करू.

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘पी. एन.’ व मी जिल्ह्यात दीर्घकाळ काम केले. त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना कायमच सन्मानाची वागणूक दिली जाईल. आगामी काळात सर्वच निवडणुकीत आमच्यासमोर कोणीही टिकाव धरणार नाही. माझ्या मित्राला सल्ला आहे, राहुल-राजेश यांना आशीर्वाद द्या.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील म्हणाले, “पी. एन. पाटील यांनी आयुष्यभर काँग्रेसची विचारधारा जपली. मात्र त्यांच्या निधनानंतर काँग्रेसच्या वरिष्ठांना सांत्वनाला वेळ मिळाला नाही. पवार कुटुंबांशी आमचे तीन पिढ्यांचे नाते आहे. भोगावतीला अजित पवार यांनी विनाअट मदत केली. ‘भोगावती’चे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी स्वागत केले. ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांनी प्रास्ताविक केले.

माजी आमदार के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मानसिंगराव गायकवाड, अरुण डोंगळे, आदिल फरास, भैय्या माने, मधुकर जांभळे, पी. डी. धुंदरे, धैर्यशील पाटील-कौलवकर, तेजस्विनी राहुल पाटील, शिवाजी आडनाईक, हंबीरराव वळके, शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष विलास चौगले, गणेश आडनाईक आदी उपस्थित होते.

कोल्हापूरचा शेतकरी राज्यात नंबर वन

पीक कर्जाची नियमित परतफेड असू दे अथवा वीजबिल भरणा यामध्ये कोल्हापूर नंबर वन आहे. येथील शेतकरी कमालीचा कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे कौतुक उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

आय लव यू टू ...

उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला सुरुवात करताना एक उत्साही कार्यकर्ता आय लव यू दादा असे ओरडला. यावर पवार यांनी आय लव यू टू, म्हटल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जिल्हा परिषद झाली आता विधिमंडळ

राहुल पाटील यांना सन्मानाचे पद द्या, अशी मागणी उपस्थितांमधून वारंवार झाली. एका कार्यकर्त्यांला शांत करत उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राहुल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार, हे काय मी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? राहुल पाटील यांनी जिल्हा परिषदेत उत्कृष्ट काम केले, आता त्यांना विधिमंडळात संधी द्यायची आहे.

Web Title: P. N. Patil and Vilasrao Deshmukh as well as Me and Rahul says Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.