Kolhapur Circuit Bench: १५ हजार खटल्यांच्या फायलींसह दोन ट्रक दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 12:44 IST2025-08-12T12:42:47+5:302025-08-12T12:44:09+5:30
२४ कर्मचारी दाखल, अधिकाऱ्यांकडून कामांची पाहणी, सुरक्षेबद्दल सूचना, दोन बसस्टॉपचे स्थलांतर होणार

Kolhapur Circuit Bench: १५ हजार खटल्यांच्या फायलींसह दोन ट्रक दाखल
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयातूनकोल्हापूर ‘सर्किट बेंच’कडे वर्ग झालेल्या ५० ते ६० हजार खटल्यांपैकी सुमारे १५ हजार खटल्यांची कागदपत्रे सोमवारी (दि. ११) कोल्हापुरात पोहोचली. यातील बहुतांश कागदपत्रे फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित आहेत. ‘सर्किट बेंच’साठी चार वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १० लिपिक आणि १० शिपाई असे पहिल्या टप्प्यातील २४ कर्मचारी सोमवारी दाखल झाले. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षक आणि महापालिकेच्या प्रशासकांनी इमारतीची पाहणी करून सुरक्षेबद्दल सूचना दिल्या.
कोल्हापूर सर्किट बेंचचे कामकाज सुरू होण्यास अवघ्या सहा दिवसांचा अवधी उरला आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील कामांना गती आली आहे. सर्किट बेंचकडे वर्ग झालेल्या खटल्यांपैकी सुमारे १५ हजार खटल्यांची कागदपत्रे घेऊन दोन ट्रक कोल्हापुरात पोहोचले. उच्च न्यायालयाने सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी चार अधिकारी आणि २० कर्मचारी सोमवारी सर्किट बेंचमध्ये रुजू झाले. आणखी काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नियुक्ती लवकरच होणार आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक योगेश कुमार, महापालिकेच्या प्रशासक मंजुलक्ष्मी, अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार, शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी सोमवारी सकाळी सर्किट बेंच इमारतीच्या कामाची पाहणी केली. यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपस्थित होते.
सुरक्षेसाठी बस स्टॉप हलवणार
सुरक्षेच्या कारणामुळे सीपीआरसमोरील आणि सिद्धार्थनगर कमानीसमोरचा बस स्टॉप इतरत्र हलवण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच सर्किट बेंच इमारतीच्या प्रवेशद्वारात स्कॅनर, मेटल डिटेक्टर बसवले जाणार आहे. समोरच्या रोडवर नो-पार्किंग झोन करण्याचे काम सुरू आहे. वकील आणि पक्षकारांसाठी दसरा चौक, व्हीनस कॉर्नर गाडी अड्डा, लक्ष्मी जिमखाना आणि शंभर फुटी रोड येथे पार्किंगची व्यवस्था केली जाणार आहे. गरजेनुसार एकेरी मार्गांचे नियोजन केले जाईल. न्यायमूर्तींसाठी प्रतिभानगर येथील निवासस्थानी सुरक्षा पुरवली जाईल, अशी माहिती अधीक्षक योगेश कुमार यांनी दिली.
अतिक्रमणे हटवण्यासाठी मनपाला पत्र
भाऊसिंगजी रोड आणि या रोडला जोडणाऱ्या सर्वच मार्गांवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी पोलिसांनी महापालिका प्रशासनाला पत्राद्वारे केली आहे. आवश्यक असेल तिथे पोलिस बंदोबस्त पुरवण्याचीही तयारी दर्शवल्याचे वाहतूक पोलिस निरीक्षकांनी सांगितले.
सर्किट बेंचसाठी २४ कर्मचाऱ्यांची सोमवारीच हजेरी
उपरजिस्ट्रार संदीप भिडे, सेक्शन ऑफिसर सचिन कांबळे, सहायक सेक्शन ऑफिसर संतोष ढोबळे, संतोष भगळे, लिपिक राहुल घाटगे, अरुण क्षीरसागर, यशोधन अनावरकर, अनंत ढेरे, शुभम तळेकर, प्रमोद कोळी, सिद्धेश फोंडके, अजिंक्य यादव, गणेश निराटे, पृथ्वीराज खोत, शिपाई नामदेव पाटील, राहुल सुतार, मच्छिंद्र जाधव, मकरंद पाटील, शुभम पाटील, नितेश पाटील, संकेत पाटील, दिगंबर पाटील, प्रशांत नेर्लेकर आणि तुषार कारंडे यांना सोमवारी (दि. ११) सकाळी १० वाजता कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये उपस्थित राहण्याचा आदेश उच्च न्यायालय प्रशासनाने काढला होता. त्यानुसार अधिकाऱ्यांसह एकूण २४ कर्मचारी सोमवारी हजर झाले.
सतेज पाटील-महाडिक खटलाही वर्ग
मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये वर्ग केलेल्या खटल्यांची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्यात निवडणूक, आयकर, केंद्रीय उत्पादन शुल्क, जीएसटी, सहकार यासह विविध फौजदारी खटल्यांची माहिती आहे. निवडणुकांच्या काळात दाखल झालेले राजकीय नेत्यांचे खटलेही पहिल्या टप्प्यात वर्ग झाले आहेत. त्यात आमदार सतेज पाटील विरुद्ध शौमिका महाडिक, आमदार अमल महाडिक विरुद्ध शशिकांत खोत यांच्या खटल्यांचा समावेश आहे. सोमवारी (दि. १८) सुनावणी होणाऱ्या खटल्यांची माहिती शनिवारी वेबसाईटवर अपलोड होणार आहे.