शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचीच संमती, मुख्यमंत्र्यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:00 IST2025-02-25T11:59:57+5:302025-02-25T12:00:26+5:30
हरकती समोर आणण्याचे समितीचे आव्हान

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचीच संमती, मुख्यमंत्र्यांचा दावा
कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबतकोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींनी मला निवेदन दिले असून यातील काही शेतकऱ्यांनी हा महामार्ग करा असे म्हटले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. सगळ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करणारच, असेही त्यांनी ठणकावून सांगितल्याने पुन्हा एकदा या महामार्गाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, कुणाचा विरोध पत्करून हा महामार्ग करणार नाही. सगळ्यांना त्याचे फायदे समजावून आम्ही शक्तिपीठ महामार्ग करणार आहे. दरम्यान, फडणवीस यांचा हा दावा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने खोडून काढला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरात रद्द करतो असे सांगितले. आता ते कोल्हापुरातून करणारच असे म्हणतात. हिम्मत असेल तर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकती समोर आणा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे आव्हान समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिले.
सरकारला आम्ही जुमानत नाही
या सरकारला आम्ही जुमानत नाही आमच्या गावात आमचे सरकार असेल हे आम्ही सिद्ध करू. ते बदलणार होते. आणि आता निवडणुकीनंतर त्यांनी बदलून सिद्ध केले आहे. हे कंत्राटदारांना विकले गेलेले सरकार असल्याची टीका फोंडे यांनी केली.