यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलणार

By admin | Published: April 6, 2015 09:01 PM2015-04-06T21:01:24+5:302015-04-07T01:30:09+5:30

गडहिंग्लज पालिका : राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवकांच्या बैठकीत निर्णय

Only after the yatra may the township change | यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलणार

यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलणार

Next

गडहिंग्लज : मे मध्ये होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलण्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवकांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला.विद्यमान नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे यांची मुदत संपल्याने त्यांचा राजीनामा घेऊन त्याजागी अन्य इच्छुकांना संधी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, १५ वर्षांनंतर होणाऱ्या लक्ष्मी यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, यात्रेच्या नियोजनात व्यत्यय येऊ नये, म्हणून यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलावा, अशी विनंती यात्रा समितीसह प्रतिष्ठित नागरिकांच्या शिष्टमंडळाने आमदार हसन मुश्रीफ यांना भेटून केली होती.
या पार्श्वभूमीवर स्थानिक पदाधिकारी व नगरसेवकांनी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्याची सूचना आमदार मुश्रीफ यांनी केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. नगराध्यक्ष बदलाच्या प्रक्रियेत वेळ जाऊन नागरिक व भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी यात्रेनंतरच नगराध्यक्ष बदलाचा निर्णय यावेळी एकमताने घेण्यात आला.बैठकीस राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष वसंत यमगेकर, नगरपालिकेतील गटनेते रामदास कुराडे, शिक्षण मंडळ सभापती सुरेश कोळकी यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पार्किंग जागा, वाहतुकीबाबत बैठकीत चर्चा
गडहिंग्लज : मे महिन्यात होणाऱ्या येथील श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राकाळातील दुकानदारांची बैठक व्यवस्था, वाहतुकीचे नियोजन, पार्किंगच्या जागा आणि नागरी सुविधांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली.
तहसीलदार हनुमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत यात्रेच्या तयारीचा
आढावा घेण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, बड्याचीवाडीच्या सरपंच गीता देसाई, उपसरपंच वैभव साबळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पडवळ, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नगरपालिका व पोलिसांनी वाहनतळांची जागा निश्चित करावी. बसगाड्यांसह खासगी वाहनांच्या वाहतुकीबाबतही निश्चित धोरण ठरवावे, अशी सूचना तहसीलदारांनी केली.
यात्रेनिमित्त शहरात येणाऱ्या विविध स्टॉलधारकांच्या बैठकीची व्यवस्था पालिका व पोलीस यांनी संयुक्तपणे करावी. यात्रेत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जागांची निश्चिती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यात्रेसाठी मागविण्यात येणाऱ्या मिनीबसेसऐवजी गडहिंग्लज शहरातील वाहतुकीच्या डबलडोअरच्या बसगाड्या मागवाव्यात, अशी सूचना करण्यात आली.
यात्रा कालावधीत शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी रिंगरोडवरील जमीनमालक शेतकऱ्यांच्या सहमतीने किमान तात्पुरती वाहतूक सुरू करावी, अशी सूचनादेखील करण्यात आली.
बैठकीस नगरअभियंता रमेश पाटील, जलअभियंता जमीर मुश्रीफ,
उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनील कुरुंदवाडे, आगारप्रमुख सुनील जाधव, यात्रा समितीचे उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ, काशिनाथ देवगोंडा, अमरनाथ घुगरी, सुधीर पाटील, आदींसह विविध खात्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Only after the yatra may the township change

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.