महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

By संदीप आडनाईक | Published: May 22, 2024 02:13 PM2024-05-22T14:13:22+5:302024-05-22T14:13:44+5:30

संदीप आडनाईक कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर -मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला ...

One reserved coach of Kolhapur-Mumbai Kolhapur Mahalakshmi Express reduced from Saturday | महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

महालक्ष्मी एक्स्प्रेसचा एक आरक्षित डबा शनिवारपासून कमी, रेल्वे संघटना आक्रमक 

संदीप आडनाईक

कोल्हापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी एक असलेल्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसला जोडलेला एक आरक्षित डबा शनिवारपासून (दि.२५ मे) पासून कमी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतल्याने रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाली आहे. डबा कमी करण्यापेक्षा वाढवण्याची मागणी असताना रेल्वे प्रशासन कोल्हापूरकरांवर अन्याय करत असल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूरसाठी (ट्रेन क्रमांक १७४११/१७४१२) महालक्ष्मी एक्स्प्रेसचे सर्व जुने आयसीएफ कोच बदलून जानेवारी २०२४ पासून नवीन एलएचबी कोच जोडले आहेत. प्रवासी आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा आनंद घेत असतानाच प्रशासनाने या गाडीचा एस ११ हा आरक्षित डबा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजही या रेल्वेला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते. ही गाडी कोल्हापूर येथून रोज रात्री ८:५० वाजता मुंबईसाठी सुटते.

उत्पन्न देणारी गाडी..

कोल्हापुरातून सुटणाऱ्या या गाडीच्या प्रत्येक फेरीमधून रेल्वेला १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या रेल्वे गाडीपैकी महालक्ष्मी एक्स्प्रेस या गाडीचा समावेश असतानाही या गाडीचा एक डबा १९७१ पासून धावतेय महालक्ष्मी मीटर गेजची ब्रॉड गेजमध्ये परिवर्तन झाल्यापासून म्हणजे १८ मार्च १९७१ या दिवसांपासून ही एक्स्प्रेस कोल्हापुरातून या मार्गावर सातत्याने धावत आली आहे. २७ जुलै २०१९ या दिवशी ही गाडी महापुरामुळे बदलापूर आणि वांगनी स्टेशनदरम्यान १२ ते १५ तास थांबून राहिली होती.

मध्य रेल्वेला उत्पन्न देणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला दोन डबे वाढविण्याची मागणी असताना आता एक आरक्षित डबा कमी करण्यात येणार आहे. हे अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द न केल्यास नाईलाजाने तीव्र आंदोलन करावे लागेल. -सुहास गुरव, अध्यक्ष, महाराष्ट्र रेल्वे व रोड पॅसेंजर्स असोसिएशन
 

कोल्हापूरहून सुटणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसला ५०० पेक्षा जास्त वेटिंग असते, त्यामुळे एस १२ आरक्षित एलएचबी कोच वाढवण्याची मागणी केली आहे. परंतु आता आहे त्यातीलच एक डबा कमी करण्याचा निर्णय धक्कादायक आहे. सह्याद्री सुरू नसल्यामुळे या गाडीवर लोड वाढलेला आहे, तो कमी करण्याऐवजी प्रशासन भलतेच निर्णय घेत आहे. कोल्हापूरचे प्रवासी हे सहन करणार नाहीत. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई रेल्वे सल्लागार सदस्य.

Web Title: One reserved coach of Kolhapur-Mumbai Kolhapur Mahalakshmi Express reduced from Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.