वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 15:53 IST2025-10-25T15:52:21+5:302025-10-25T15:53:15+5:30
परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा

वाहतूक कोंडीतील वादातून एकावर खुनी हल्ला, कोल्हापुरातील घटना
कोल्हापूर : वाहतूक कोंडीतील भांडणात हस्तक्षेप करीत माझी रिक्षा तेवढी येथून घेऊन जातो, असे सांगताना फळविक्रेता अरबाज फयाज बागवान (वय २७, रा. रेडेकर गल्ली, लक्षतीर्थ वसाहत, सध्या रा. फायर स्टेशनजवळ, फुलेवाडी, कोल्हापूर) यांच्यावर एडका, कोयत्याने खुनी हल्ला झाला. याप्रकरणी अक्षय आनंदा ओतारी ( वय २६, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) याच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजता कोल्हापूर-गगनबावडा रोडवर खांडसरी फाटा येथील हॉलसमोर ही घटना घडली.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी अरबाज पत्नीसोबत बालिंगा येथे मित्राच्या घरी जेवणासाठी रिक्षातून जात होते. त्यावेळी खांडसरी फाट्यावर त्यांच्या रिक्षासमोर वाहतूक कोंडी झाली होती. तेथे आरोपी अक्षय याचे भांडण सुरू होते. त्यावेळी रिक्षातील अरबाज हे अक्षयला माझी रिक्षा येथून घेऊन जातो, असे सांगितले. यावर अक्षय याने अरबाजला अर्वाच्च शिवीगाळ केली. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याने कमरेत खोवलेला एडका, कोयत्याने अरबाज बागवान यांच्या तोंडावर, डोक्यावर, गळ्यावर, पाठीत मारले.
याची फिर्याद जखमी अरबाज बागवान यांनी पोलिसात दिली आहे. या प्रकरणात घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांनी भेट देऊन तपासासंबंधी मार्गदर्शन केले. गंभीर जखमी अरबाज यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहे.
परस्पर विरोधी फिर्याद, बागवान याच्यावरही गुन्हा
खानसरी फाट्यावरील खुनी हल्ला प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला आहे. आनंद मुकुंद ओतारी (वय ५३, रा. बालिंगा, ता. करवीर) यांच्या फिर्यादीवरून आरबाज बागवान याच्याविरोधात शुक्रवारी करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीचा मुलगा अक्षयवर आरबाज याने चाकूने हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.