Kolhapur Crime: वाढदिवसाच्या पार्टीत राडा; एकाने बीअरची बाटली डोक्यात फोडली, दुसऱ्याने चाकूने भोसकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:41 IST2025-10-24T12:40:17+5:302025-10-24T12:41:40+5:30
दोघे जखमी, परस्परविरोधी फिर्यादी दाखल

Kolhapur Crime: वाढदिवसाच्या पार्टीत राडा; एकाने बीअरची बाटली डोक्यात फोडली, दुसऱ्याने चाकूने भोसकले
कोल्हापूर : वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या तीन मित्रांच्या पार्टीत दोघा भावांनी आकाश भोसले (रा. शिवाजी पेठ) याच्या डोक्यात बीअरच्या बाटल्या फोडून त्याला जखमी केले, तर भोसले याने केलेल्या चाकूहल्ल्यात अजिंक्य साळोखे हा जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि. २१) शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत घडली.
जुना राजवाडा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी पेठेतील आकाश भोसले याने वाढदिवसाच्या निमित्ताने सोमवारी मध्यरात्री दोन मित्रांना पार्टी दिली. पहाटेपर्यंत रंगलेल्या पार्टीत भोसले याचा अक्षय साळोखे आणि त्याचा भाऊ अजिंक्य साळोखे या दोघांसोबत वाद झाला. याच वादातून साळोखे बंधूंनी आकाश याच्या डोक्यात बीअरच्या बाटल्या फोडून त्याला मारहाण केली. भोसले याने अजिंक्य याला चाकूने भोसकले.
यात अजिंक्य गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, डोक्याला दुखापत झाल्याने त्यालाही सीपीआरमध्ये दाखल केले. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्याचे काम सुरू होते.