Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:55 IST2025-08-08T17:55:00+5:302025-08-08T17:55:20+5:30
घराचे स्वप्न राहिले अर्धवटच..

Kolhapur: जुन्या घराची भिंत अंगावर कोसळून एकजण जागीच ठार
म्हाकवे : जुन्या घराची भिंत खाली उतरवून घेत असताना ही भिंत अंगावर कोसळल्याने सोनगे ता कागल येथील साताप्पा संतू कांबळे (वय-७२) यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचे वृत्त समजताच गावकऱ्यातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची नोंद मुरगूड पोलिसात झाली आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली याबाबत अधिक माहिती अशी, कांबळे यांच्या घराचे नव्याने बांधकाम सुरू आहे. मागील बाजुचे बांधकाम पुर्ण झाल्याने त्यांनी पुढील बाजूचेही बांधकाम करून घेण्यासाठी जुनी भिंत उतरवून घेत होते. यासाठी सकाळी साडेदहाच्या सुमारास साताप्पा हे एका बाजूला तर त्यांचा मुलगा दयानंद कांबळे हा दुसऱ्या बाजूला भिंत उतरवून घेण्याच्या कामात व्यस्त होते. अचानक साताप्पा कांबळे यांच्याकडील बाजुला ही भिंत कोसळली. साताप्पा यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.
घराचे स्वप्न राहिले अर्धवटच..
अल्पभूधारक शेतकरी असणार्या साताप्पा यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाने घराची उभारणी करण्याचा निर्धार केला. मागील बाजुचे बांधकामही पुर्ण झाले आहे. तर पुढील बाजुचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. माञ, साताप्पा यांच्या घराचे पुर्णत्वाचे स्वप्न अपुरेच राहिल्याने हळहळ व्यक्त होत आहे.