नजरचुकीने एक लाख रुपये सेंड झाले; कोल्हापुरातील प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 15:54 IST2026-01-29T15:53:36+5:302026-01-29T15:54:09+5:30

पोलिसांनी केले रिक्षाचालकाचे कौतुक

One lakh rupees was sent by mistake Honest rickshaw driver in Kolhapur returned it | नजरचुकीने एक लाख रुपये सेंड झाले; कोल्हापुरातील प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले

नजरचुकीने एक लाख रुपये सेंड झाले; कोल्हापुरातील प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केले

कोल्हापूर : नाव आणि मोबाईल नंबरमधील साधर्म्यामुळे बांधकाम कामगार ठेकेदार लक्ष्मण दयाप्पा शिंदे (वय ४५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) यांच्याकडून यूपीए पेमेंटवरून नजरचुकीने एक लाख रुपये रिक्षाचालक लहू अभिमान कांबळे यांना सेंड झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी फोन करताच स्वत: पोलिस ठाण्यात पोहोचून कांबळे यांनी लाखाची रक्कम परत केली. प्रामाणिकपणाबद्दल पोलिसांनी कांबळे यांचे कौतुक केले.

बांधकाम कामगार ठेकेदार लक्ष्मण शिंदे हे पत्नी आणि मुलासोबत राजेंद्रनगरमध्ये राहतात. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास व्यवसायातील जीएसटीची रक्कम भरण्यासाठी ते स्वत:च्या दोन बँक खात्यांपैकी एका खात्यावर पैसे जमा करीत होते. मोबाईल नंबरमधील साधर्म्य आणि नावातील 'एल' या आद्याक्षरामुळे त्यांची गफलत झाली.

नजरचुकीने त्यांनी एक लाख रुपये स्वत:च्या मोबाईल नंबरऐवजी लहू कांबळे यांच्या मोबाईल नंबरवर पाठवली. त्यानंतर खात्यावरील रक्कम तपासताना त्यांना एक लाख रुपये दुसऱ्याच व्यक्तीच्या नंबरवर गेल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात धाव घेऊन अंमलदार सुप्रिया कांबळे यांना घडलेला प्रकार सांगितला.

सुप्रिया कांबळे यांनी पैसे गेलेल्या नंबरवर लहू कांबळे यांना फोन करून त्यांच्या खात्यावरील रक्कम तपासण्यास सांगितले. तसेच चौकशीसाठी राजारामपुरी पोलिस ठाण्यात येण्यास सांगितले. दुपारच्या विश्रांतीसाठी घरी पोहोचलेले रिक्षाचालक कांबळे यांनी मोबाईलवरून बँक बॅलन्स तपासताच त्यांना एक लाख रुपये जमा झाल्याचे लक्षात आले.

काही वेळातच रक्कम परत

काही वेळातच राजारामपुरी पोलिस ठाण्यात पोहोचून त्यांनी लाखाची रक्कम शिंदे यांच्या नंबरवर परत पाठवली. अपर पोलिस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू आणि शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी प्रामाणिकपणाबद्दल रिक्षाचालक लहू कांबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

Web Title: One lakh rupees was sent by mistake Honest rickshaw driver in Kolhapur returned it