Kolhapur Accident News: ओव्हरटेक करताना दोन भरघाव दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, तिघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 12:53 IST2025-12-18T12:53:26+5:302025-12-18T12:53:42+5:30
हातकणंगले-कुंभोज रोडवर नेज येथे अपघात

Kolhapur Accident News: ओव्हरटेक करताना दोन भरघाव दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार, तिघे गंभीर जखमी
हातकणंगले : हातकणंगले-कुंभोज रोडवरील नेज येथील लक्ष्मी मंदिरासमोरील धोकादायक वळणावर दोन भरघाव दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात आकाश अजित अबदाण (वय २१, रा. रुई) हा युवक ठार झाला, तर दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले. बुधवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आकाश अजित अबदाण आपल्या मित्रासह कुंभोजकडून हातकणंगलेकडे दुचाकीवरून येत होता, तर हातकणंगलेकडून राहुल खोत विनानंबर दुचाकीवरून कुंभोजकडे जात होता. नेज गावच्या हद्दीतील लक्ष्मी मंदिरासमोरील धोकादायक वळणावर उसाचा ट्रॅक्टर ट्रॉली ओव्हरटेक करत असताना दोन्ही भरधाव दुचाकीची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये आकाश अबदाण रस्त्यावर पडला; डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्याचे सहकारी आदिराज काश्मिरे, हर्ष काश्मिरे आणि दुसरा दुचाकीस्वार राहुल खोत हे तिघे जखमी झाले. जखमींना तत्काळ हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघातानंतर १०८ रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला, ती वेळेत न आल्याने जवाहर साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन बाबासाहेब चौगुले यांनी आपली चारचाकीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत.