Kolhapur Accident News: पत्नीसमोरच एसटी बसने चिरडले, पती जागीच ठार; ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 12:09 IST2025-10-21T12:09:01+5:302025-10-21T12:09:23+5:30
देवदर्शन करून परतताना काळाचा घाला, पत्नी किरकोळ जखमी

Kolhapur Accident News: पत्नीसमोरच एसटी बसने चिरडले, पती जागीच ठार; ऐन दिवाळीत कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कळंबा/कोल्हापूर : आदमापूर येथे देवदर्शन करून कोल्हापूरकडे परत येताना कळंबा येथील घोडके मळ्याजवळ एसटी बसने चिरडल्याने सतीश लक्ष्मण धोंडफोडे (वय ५०, रा. सुर्वेनगर, कोल्हापूर) हे जागीच ठार झाले. दुचाकीतील पेट्रोल संपल्याने पत्नीला उतरवून ते दुचाकी ढकलत पेट्रोल पंपाकडे निघाले होते. त्याचवेळी गारगोटीच्या दिशेने निघालेल्या भरधाव एसटी बसने त्यांना चिरडले. सोमवारी (दि. २०) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात पत्नीच्या समोरच पतीचा दुर्दैवी अंत झाला. या अपघातात त्यांच्या पत्नी गीता (वय ४०) किरकोळ जखमी झाल्या.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सुर्वेनगर येथील आदिनाथ नगर परिसरात राहणारे सतीश धोंडफोडे केबलचा व्यवसाय करीत होते. सोमवारी सायंकाळी ते पत्नीला सोबत घेऊन आदमापूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. परत येताना कळंबा गावच्या हद्दीत घोडके मळ्याजवळ त्यांच्या दुचाकीतील पेट्रोल संपले. पत्नीला उतरवून ते दुचाकी वळवून घेतली. पुन्हा गारगोटीच्या दिशेने काही अंतरावरील पेट्रोल पंपावर जाऊन ते पेट्रोल भरणार होते. त्याचवेळी रस्ता ओलांडून पुढे जाताना वळणावर कोल्हापूरच्या दिशेने आलेल्या गारगोटी एसटी बसने त्यांना चिरडले.
एसटी बसच्या पुढील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर एसटी बसचे चालक आणि वाहक पळून गेले. प्रवासी आणि रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनधारकांनी अपघाताची माहिती करवीर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठविला. या अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले.
सतीश धोंडफोडे हे गेल्या ३० वर्षांपासून शहरात केबलचा व्यवसाय करीत होते. त्यांचा मुलगा खासगी कंपनीत नोकरी करतो, तर मुलगी विवाहित आहे. ऐन दिवाळीत झालेल्या अपघातामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआरमध्ये अपघात विभागाबाहेर गर्दी केली होती. अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.
पत्नीला धक्का
धोंडफोडे दाम्पत्य अवघ्या पाच ते सात मिनिटांत घरी पोहोचणार होते. पेट्रोल संपल्याचे निमित्त झाले आणि रस्ता ओलांडून जाताना काळाने घाला घातला. डोळ्यांदेखत पतीचा मृत्यू झाल्याने गीता यांना धक्का बसला. या अपघातात त्या किरकोळ जखमी झाल्या. त्याहीपेक्षा डोळ्यांसमोर झालेल्या अपघाताने त्यांना मोठा धक्का बसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
घोडके मळा परिसर बनतोय ब्लॅक स्पॉट
गारगोटी रोडवरील कळंबा गावच्या हद्दीतील घोडके मळ्याजवळील वळण अपघातांचा ब्लॅक स्पॉट बनत आहे. या परिसरात भरधाव वाहनांवरील नियंत्रण सुटते. त्यामुळे वारंवार अपघात घडत आहेत. गेल्या वर्षभरात या ठिकाणी चौघांना जीव गमवावा लागला. सुरक्षित प्रवासासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कळंबा येथील नागरिकांकडून केली जात आहे.