मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 16:59 IST2025-09-19T16:57:15+5:302025-09-19T16:59:40+5:30

आशिष शेलार यांच्या उपस्थितीत धनंजय महाडिक यांचा उपक्रम

On the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday 42 girls were given gold rings by MP Dhananjay Mahadik | मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

मोदींचा वाढदिवस थाटात, कोल्हापुरात ४२ मुलींना मिळाली अंगठी भेट

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनीच्या २४ तासांत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या ४२ मुलींना खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या देण्यात आल्या. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते सीपीआरमध्ये गुरुवारी दुपारी प्रातिनिधिक स्वरूपात आठ मुलींच्या मातांकडे या अंगठ्या देण्यात आल्या.

मोदी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासकीय रुग्णालयात १६ सप्टेंबरला रात्री १२नंतर ते १७ सप्टेंबर रात्री १२ वाजेपर्यंत जन्मलेल्या मुलींचा यामध्ये समावेश आहे. अतिशय अनोखा आणि स्तुत्य असा हा उपक्रम असल्याचे शेलार यांनी सांगितले. खासदार महाडिक म्हणाले, मोदी यांच्या वाढदिनी या मुलींचा जन्म झाला. दरवर्षी त्यांचा हा वाढदिवस संस्मरणीय व्हावा यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अनिता सैबन्नावर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, डॉ. गिरीश कांबळे, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, समाजसेवा अधीक्षक शशिकांत रावळ आदी उपस्थित होते.

चंदनाचे झाडही देणार भेट

महाडिक म्हणाले, याच पद्धतीने आगामी काळात शासनाची परवानगी घेऊन अशा जन्मलेल्या मुलींना दोन चंदनाची झाडे देण्यात येणार आहेत. ही झाडे १८ वर्षांपर्यंत जगविल्यास त्यातून ५० लाख रुपयांचे उत्पन्न या मुलींना मिळू शकेल. त्यातून त्यांचे शिक्षण आणि विवाह होऊ शकतील. ही योजना देशातील पहिली असल्याचा दावा यावेळी मंत्री शेलार यांनी केला.

Web Title: On the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday 42 girls were given gold rings by MP Dhananjay Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.