Navratri २०२५: पंचमीनिमित्त कोल्हापुरातील अंबाबाईची अंबारीतील पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 16:12 IST2025-09-27T16:09:00+5:302025-09-27T16:12:23+5:30
तुळजाभवानीसाठी फुलांचा हिंदोळा

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात त्र्यंबोली यात्रेनिमित्त शनिवारी कोल्हापुरातील श्री अंबाबाईची अंबारीतील पूजा बांधण्यात आली. अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीचा रुसवा काढण्यासाठी हत्तीवर बसून त्र्यंबोली टेकडीसाठी निघाली आहे असा या पूजेचा अन्वयार्थ आहे. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी देवीची फुलांच्या झुल्यावरील पूजा बांधण्यात आली.
कोल्हापुरातील वरप्राप्त देवता असलेल्या त्र्यंबोली देवीने अंबाबाईला कोल्हासुरासोबत सुरु असलेल्या युद्धात मोठी मदत केली. त्यावेळी कुमाक्षा राक्षसाने पृथ्वीवर दहशत माजवली होती. व सर्व देवांचे योगदंडाने शेळ्यांमध्ये रुपांतर केले होते. तेंव्हा त्र्यंबोली देवीने त्याच्याकडून योगदंड काढून घेऊन देवांना मुक्त केले. अंबाबाईने राक्षसाचा वध केला. पण त्या विजयाेत्सवाला त्र्यंबोली देवीला बोलवायचे राहून गेल्याने ती रुसली व अंबाबाईकडे पाठ करून बसली. ही बाब लक्षात येताच अंबाबाई स्वत: लव्याजम्यानिशी त्र्यंबोली भेटीला गेली.
त्यावेळी त्र्यंबोली देवीचा अंबाबाईला तु कोल्हासुराचा वध कसा केला ते दाखव अशी इच्छा व्यक्त केली. अंबाबाईने कोहळ्यावर हा वध करून दाखवला. तेंव्हापासून येथे पंचमीला कोहळा भेदनाचा विधी होतो. त्यासाठी अंबाबाईची पालखी टेकडीवर येते. या पौराणिक घटनेला अनुसरून ही पूजा बांधण्यात आली. ही पूजा विनय चौधरी, संजय फडणीस, मकरंद मुनीश्वर, उमेद उदगावकर यांनी बांधली. जुना राजवाड्यातील तुळजाभवानीची फुलांच्या झोपाळ्यावर हिंदोळा घेत असलेल्या रुपात बांधण्यात आली.