शिवजयंतीला हुल्लडबाजी; पुंगळ्या काढून दुचाकी फिरवल्या, कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करुन ४०० हुल्लडबाजांना साडेतीन लाखांचा दंड केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:36 IST2026-02-20T12:36:08+5:302026-02-20T12:36:33+5:30
हिडीस स्वरूपाने चांगल्या कार्यक्रमांना गालबोट

शिवजयंतीला हुल्लडबाजी; पुंगळ्या काढून दुचाकी फिरवल्या, कोल्हापूर पोलिसांनी गाड्या जप्त करुन ४०० हुल्लडबाजांना साडेतीन लाखांचा दंड केला
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून बेदरकारपणे दुचाकी चालवणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. ४०९ वाहनचालकांकडून साडेतीन लाखांचा दंड वसूल केला. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात. शिवज्योत आणली जाते. याशिवाय काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादरम्यान काही हुल्लडबाजांकडून बेदरकारपणे वाहने चालवून स्वत:सह इतरांच्याही जीवाला धोका निर्माण केला जातो. सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून बेदरकारपणे दुचाकी चालवण्याचे प्रकार वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेसह शाहूपुरी, राजारामपुरी, लक्ष्मीपुरी आणि जुना राजवाडा पोलिसांनी बुधवारी (दि. १८) सायंकाळपासून ते गुरुवारी (दि. १९) सकाळी अकरापर्यंत विशेष मोहीम राबवली.
हुल्लडबाजी करणाऱ्या ४०९ वाहनधारकांना पकडून साडेतीन लाखांचा दंड केला. मोठ्या आवाजासाठी पुंगळ्या काढलेल्या ३२ दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे दुचाकी देताना वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचना द्यावेत. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाहतूक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिला आहे.
हिडीस स्वरूप
अनेक मंडळे विधायक उपक्रमांनी जयंती साजरी करतात. काही मंडळांचे कार्यकर्ते अतिउत्साहाच्या भरात दुचाकींच्या पुंगळ्या काढून रात्रभर परिसरात फिरवतात. काही ठिकाणी डीजेचा दणदणाट केला जातो. हिडीस स्वरूपाने चांगल्या कार्यक्रमांना गालबोट लावले जाते. यावर मंडळे आणि तरुणांनी गांभीर्याने विचार, अशी अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
अशा केल्या कारवाया
गुन्हा - कारवाया - दंड
लायसन्स जवळ नसणे - १०७ - ७१ हजार
ट्रिपल सीट - ४५ - ४५ हजार
म्युझिकल हॉर्न - ४० - २५ हजार
मोबाइलसह ड्रायव्हिंग - ३१ - ३१ हजार
कर्कश हॉर्न - २२ - २२ हजार
विनालायसन्स - ११ - ५५ हजार
एकेरी मार्गाचे उल्लंघन - १० - ५ हजार
अल्पवयीन मुलांना वाहन देणे - २ - १० हजार
इतर - १२० - ७४ हजार ९५०
दुचाकी पेटली
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या काही हुल्लडबाज तरुणांनी रात्रभर पन्हाळा रोडवर उच्छाद मांडला. सायलेन्सरला आग लावून दुचाकी पळवणे, स्टंट करणे, आरडाओरडा करणे, कर्कश्श आवाज काढण्याचे प्रकार सुरू होते. यातून केर्ली येथील ग्रामस्थांनी काही हुल्लडबाजांना चोप दिला. वारणानगर येथे स्टंट करताना एका दुचाकीने पेट घेतला. पाचगाव परिसरातही काही ठिकाणी पहाटेपर्यंत सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून दुचाकी पळविण्याचे प्रकार सुरू होते.