कोल्हापूर ते नंदवाळ उद्या वारी, फलकांद्वारे निवडणुकीची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 19:16 IST2025-07-05T19:14:14+5:302025-07-05T19:16:08+5:30
पालखी मार्गावर ओंगळवाणे प्रदर्शन

संग्रहित छाया
कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त कोल्हापूर ते नंदवाळ असा रविवारी दिंडी सोहळा होत असून, वारकऱ्यांचे स्वागत करण्याकरिता या मार्गावर पावलोपावली मोठ्या संख्येने डिजिटल फलक उभारले आहेत. जिल्हा परिषद तसेच महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणारे उमेदवार तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेसमोर जाण्याची डिजिटल फलकांच्या माध्यमातून ही संधी साधली आहे. परंतु त्यामुळे पालखी मार्गावर अत्यंत ओंगळवाणे प्रदर्शन झाले आहे. ज्यांनी कधीच पंढरीच्या पांडुरंगाला पाहिले नाही, वारी दोन पाउले चालले नाहीत असे लोकही गळ्यात वीणा घालून डिजिटलवर झळकले आहेत.
कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून मिरजकर तिकटीजवळील विठ्ठल मंदिरापासून सुरू होणारा हा दिंडी सोहळा प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे विसर्जित होतो. लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होऊन चालत वारी पूर्ण करत आहेत. यावर्षी उद्या, रविवारी आषाढी एकादशी असून याच दिवशी सकाळी ८ वाजता हा दिंडी सोहळा सुरू होणार आहे. या दिंडीत चांदीचा रथ हे मुख्य आकर्षण राहणार आहे.
नंदवाळ वारीला यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची झालर लागली आहे. प्रशासकीय पातळीवर निवडणूक प्रभाग तयार करण्याचे काम सुरू आहे. तर इच्छुक उमेदवार प्रभागातील मतदारांच्या संपर्कात आघाडीवर आहेत. त्यांनी या वारीचे निमित्त साधून दिंडी जाणाऱ्या मार्गावर पावलोपावली डिजिटल फलक उभारले आहेत. कोल्हापूर ते नंदवाळ या दहा ते बारा किलोमीटर अंतरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा मिळेल तेथे डिजिटल फलक उभारले आहेत. क्रशर चौक ते पुईखडीपर्यंत रस्त्याच्या डिव्हायडरवरही फलकबाजी केली आहे.
काही इच्छुकांनी सामाजिक संस्था, तरुण मंडळांच्या सहकार्याने स्वागत मंडपदेखील उभारले आहेत. या स्वागत मंडपांमध्ये अल्पोपाहार, फळे, चहा, दूध असे उपवासाचे पदार्थ वाटपाचेही नियोजन केले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने दिंडी जाणाऱ्या मार्गावरील खराब रस्त्यांवर मुरुमाचे पॅचवर्क केले असून, सर्व रस्ते स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे.