Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची कमलालक्ष्मी रूपात पूजा, तोफेच्या सलामीने घटस्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 16:51 IST2025-09-22T16:50:27+5:302025-09-22T16:51:10+5:30

यंदा नवरात्रौत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील पूजा बांधण्यात येणार

On the first day of Sharadiya Navratri festival Ambabai is worshipped in the form of Kamala Lakshmi, the installation ceremony is held with a cannon salute. | Kolhapur: नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची कमलालक्ष्मी रूपात पूजा, तोफेच्या सलामीने घटस्थापना

छाया : आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, सोमवारपासून मंगलमयी वातावरणात प्रारंभ झाला. सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना झाली. पहिल्या दिवशी घट बसत असल्याने देवीची बैठी रूपात पूजा बांधली गेली. यंदा नवरात्रौत्सवात अंबाबाईची दशमहाविद्या रूपातील पूजा बांधण्यात येणार असून, सोमवारी देवीची कमळात बसलेल्या लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.

देशातील ५१ व महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील देवता असलेल्या अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातील लाखो भाविक या काळात कोल्हापूरला भेट देतात. सोमवारी पहाटे काकड आरती, पहिला अभिषेक झाल्यानंतर साडेआठ वाजता मुनिश्वर घराण्यातील श्रीपूजकांच्या हस्ते घटस्थापना झाली. तोफेच्या सलामीने देवीचे घट बसले आणि अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची कमळात बसलेल्या लक्ष्मी रूपात पूजा बांधण्यात आली.

या देवीची सुवर्णाप्रमाणे तेजस्वी कांती असून, ही देवी दिव्य अलंकाराने तेजस्वी व सुंदर दिसते. देवीच्या दोन्ही हातात कमळ असून, खालचे दोन्ही हात वरदायक व अभय देत आहेत. ही देवी कमळात बसली असून, हत्तींचीही उपस्थिती आहे. ही दशमहाविद्यातील दहावी देवता आहे. देव व असुरांनी समुद्र मंथन केले, तेव्हा श्री कमलालक्ष्मी ही पहिली देवतारत्न मार्गशीर्ष अमावस्येला प्रकट झाली. त्यानंतर अन्य तेरा रत्ने प्रकट झाली. या देवीला कमला, लक्ष्मी, दशमी, गजलक्ष्मी, गजेंद्रलक्ष्मी नावाने ओळखले जाते. हिच्या उपासनेने दारिद्र्य, दु:ख शोक, दुर्भाग्य नष्ट होऊन सुख-सौभाग्य, यश व उन्नती लाभते अशी श्रद्धा आहे.

Web Title: On the first day of Sharadiya Navratri festival Ambabai is worshipped in the form of Kamala Lakshmi, the installation ceremony is held with a cannon salute.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.