सागर शिंदेदिंडनेर्ली : वडिलांनी कष्टातून उभ्या केलेल्या रोलर गॅरेजमध्ये हातभार लावत डिझेल मेकॅनिकचे शिक्षण घेत मेकॅनिकल होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ओम पाटीलच्या अकाली मृत्यूने त्याचे मेकॅनिक बनण्याचे स्वप्न पहाटेच्या प्रहरी विरून गेले. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने सूर्योदयापूर्वीच कुटुंबावर दु:खाचा डाेंगर काेसळला.घरातील जिना चढत असताना पाय घसरून पडल्याने दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील ओम अमृत पाटील (वय १७ ) याचा मृत्यू झाला. बुधवारी पहाटे सव्वाचार वाजताही घटना घडली आहे.याबाबत नातेवाइकांकडून मिळालेली माहिती अशी की, पहाटे सव्वाचार वाजता ओम बाथरूमसाठी बेडरूममधून खाली आला. बाथरूममधून पाय धुवून झोपण्यासाठी पुन्हा वर जात असताना जिन्याच्या पायरीवरून पाय घसरून खाली कोसळला.त्याच्या कोसळण्याच्या आवाजाने पाणी भरत असलेली आई धावत आली आणि आरडाओरड केली. तेव्हा ओमचे वडीलही धावत खाली आले. त्यांनी त्याला तत्काळ स्वतःच्या वाहनातून कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात नेले. तेव्हा डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.सीपीआरमध्ये शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. गावी मृतदेह आणल्यानंतर आई, वडील, बहीण यांनी फोडलेला हंबरडा उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.ओमचे वडील अमृत यांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून मोठ्या कष्टाने हेल्पर ते स्वतःचे गॅरेज व रोलर मालक असा जिद्दीचा प्रवास केला आहे. मुलालाही मेकॅनिक होण्याची आवड असल्याने दहावीनंतर त्याला जैताळ येथील आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेतला होता. यंदाचे दुसरे वर्ष होते. शिक्षण घेत ओम वडिलांच्या गॅरेजमध्ये मदत करत होता.दोघांचा लागोपाठ मृत्यूओमच्या घराला लागून घर असलेल्या आयुष शेटे याचा १० एप्रिल रोजी पोहताना दम लागून मृत्यू झाला होता. तो ही एकुलता होता. आयुष व ओम हे दोघे नेहमी एकत्रित असायचे. तीन महिन्यांनंतर ओमचा मृत्यू झाला. शेजारील दोन्ही घरातील एकुलत्या मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने दुर्दैवी योगायोगाची चर्चा सुरू होती.
Kolhapur: जिन्यावरून बेडरुमकडे जाताना पाय घसरला, एकुलता मुलगा जिवाला मुकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:57 IST