केशवरावचे भाडे कमी करण्यासाठी आता आरपारची लढाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 10:18 IST2020-12-15T10:17:03+5:302020-12-15T10:18:45+5:30
मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे कमी करण्यासाठी आता आर-पारची लढाई करण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या नाट्यपरिषद, नाट्यसंस्था, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींच्या बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना यासंदर्भात गुरुवारी (दि. १०) निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही भाडे कमी झाले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी झाला.

कोल्हापुरातील कोशवराव भोसले नाट्यगृहाच्या भाडे कमी करण्यासह विविध समस्यांसंदर्भात सोमवारी देवल क्लब येथे नाट्यपरिषद, नाट्यसंस्था आणि नाट्यप्रेमींची बैठक झाली. यावेळी गिरीष महाजन, आनंद कुलकर्णी, शिवप्रसाद हिरेमठ, विद्यासागर अध्यापक उपस्थित होते.
कोल्हापूर : मुंबई, पुण्याच्या धर्तीवर कायमस्वरूपी केशवराव भोसले नाट्यगृहाचे भाडे कमी करण्यासाठी आता आर-पारची लढाई करण्याचा निर्धार सोमवारी झालेल्या नाट्यपरिषद, नाट्यसंस्था, रंगकर्मी आणि नाट्यप्रेमींच्या बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्प्यात महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना यासंदर्भात गुरुवारी (दि. १०) निवेदन देण्यात येणार आहे. त्यानंतरही भाडे कमी झाले नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा निर्णयही यावेळी झाला.
महापालिकेच्यावतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केशवराव भोसले नाट्यगृहाची ५० टक्के आसन क्षमतेने खुले केले आहे. नाट्यसंस्थांना हे परवडणार नाही. यासंदर्भात पुढील दिशा ठरविण्यासाठी देवल क्लबच्या भांडारकर सभागृहात ही बैठक झाली.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे कार्यवाहक गिरीश महाजन म्हणाले, आसनक्षमता निम्मी केल्यामुळे खर्च भागणार नाही. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेने कोरोनामध्ये नाट्यगृहाचे ७५ टक्के भाडे कमी केले पाहिजे. याचबरोबर कायमस्वरूपी मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि नाशिकच्या धर्तीवर भाडे कमी केले पाहिजे. नाट्यगृहामध्ये सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत. यावेळी नाट्यप्रेमींनी कोरोनामुळे सहा महिने उत्पन्न नव्हते, महापालिकेने काय केले. शासनाकडून महापालिकेने नाट्यगृह घेतले असून परवडत नसेल तर शासनाकडून त्यांनी अनुदान घ्यावे, अशा सूचनाही केल्या.
...अन्यथा नाट्यगृहावर बहिष्कार
पालकमंत्री सतेज पाटील, प्रशासक डॉ. बलकवडे आणि नाट्यगृह व्यवस्थापकांची पुढील आठवड्यात केशवराव भोसले नाट्यगृह येथे बैठक घ्यावी. यामध्ये भाडे कमी करण्यासोबतच इतर समस्या मार्गी लावण्याबाबत निर्णय व्हावा. त्यानंतरही कार्यवाही झाली नाही तर मात्र, आंदोलन करू, असा इशारा नाट्यसंस्थेचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांनी दिला तर काही सदस्यांनी नाट्यगृहावर बहिष्कार टाकण्याच्या सूचनाही केली.
नाट्यगृह उत्पन्नाचे साधन म्हणून पाहू नका
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी नाट्यकलेला आश्रय देण्यासाठी नाट्यगृह उभारले. हे नाट्यगृह नामशेष होण्याचा काहींचा डाव आहे. महापालिकेनेही भाडे वाढवून त्यातून फायदा कमविण्याचे पाहू नये. नाट्यगृह कोल्हापूरची सामाजिक आणि सांस्कृतिक गरज असल्याचे सुनील माने यांनी सांगितले.