म्हाकवेकरांना थेट न्यायालयाकडून वसुलीच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:04+5:302021-09-21T04:28:04+5:30

दत्ता पाटील म्हाकवेः सध्या शेतकरी कुटुंबीयांकडे पैसे येण्याचा कोणताही मार्ग नाही. ऊस अद्याप शेतातच असून, खरिपातील नुकतीच सुगी सुरू ...

Notice of recovery directly from the court to Mahakvekar | म्हाकवेकरांना थेट न्यायालयाकडून वसुलीच्या नोटिसा

म्हाकवेकरांना थेट न्यायालयाकडून वसुलीच्या नोटिसा

दत्ता पाटील

म्हाकवेः सध्या शेतकरी कुटुंबीयांकडे पैसे येण्याचा कोणताही मार्ग नाही. ऊस अद्याप शेतातच असून, खरिपातील नुकतीच सुगी सुरू झाली आहे. तर अनेकांचे पुरामुळे आणि कोरोनासह विविध आजारांमुळे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि वसुलीबाबत पूर्व इतिहास न पाहता थेट न्यायालयाकडून वसुलीच्या सुमारे ६७५जणांना नोटिसा बजाविल्या आहेत.

सध्या तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक जण मेटाकुटीला आले आहेत. याची जाणीव असतानाही ग्रामपंचायतीचा हा कारभार म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत. कराच्या वसुलीतूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालविणे सोयीस्कर ठरते. ही वस्तुस्थिती आहे; मात्र म्हाकवेरांना कित्येक वर्षांपासून एक दिवस आड पाणी मिळते; मात्र पाणीपट्टी वर्षाचीच आकारली जाते. किती सत्ता आल्या अन् बदलल्या तरीही तुंबलेल्या गटारी, अशुद्ध आणि अपुरे पाणी पाचवीलाच पुजलेले. अनेकदा सार्वजनिक खांबावर बल्ब नसल्याचे ग्रामस्थ सांगतात; मात्र जणू सर्व सेवा पुरविल्याचा आव आणत वसुलीसाठी नेहमीच तगादा लावला जातो. दरम्यान, या नोटिसीमध्ये संबंधित खातेदारांना थकबाकी २५सप्टेंबरपर्यंत भरण्याची मुदत दिली आहे, अन्यथा २५ रोजी कागल येथे तडजोडीसाठी हजर राहण्याची सूचना केली आहे; परंतु पाच वर्षापेक्षा अधिक काळ किंवा मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांना लोक न्यायालयातून नोटीसा काढण्यास हरकत नाही. अशा प्रतिक्रियाही ग्रामस्थांतून व्यक्त होत आहेत.

डिजिटल फलक लावायचे काय झाले?

पाच वर्षांवरील थकबाकीदारांच्या नावांचा डिजिटल फलक करून तो बसस्थानकावर लावण्याचा ठराव अनेक वेळा झाला. पाणी कनेक्शन तोडण्याचा ठराव झाला; मात्र याबाबत अद्याप कार्यवाही झालेली नाही.

Web Title: Notice of recovery directly from the court to Mahakvekar