'पेन्शन नाही..तोपर्यंत भाजपला मतदान नाही'; देशभरात पेन्शनधारक किती? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:21 IST2023-02-11T11:55:58+5:302023-02-11T12:21:42+5:30
२०२३ च्या अर्थसंकल्पामध्येही काही तरतूद नाही.

'पेन्शन नाही..तोपर्यंत भाजपला मतदान नाही'; देशभरात पेन्शनधारक किती? जाणून घ्या
कोल्हापूर: गेली १२ वर्षे ईपीएस ९५ मधील निवृत्तीधारकांना प्रयत्न करूनही पेन्शनमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा निर्णय पेन्शनधारकांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सर्व श्रमिक संघाच्यावतीने ही बैठक घेण्यात आली.
आंदोलनांच्या माध्यमातून प्रयत्न करूनही पेन्शनवाढीसाठी निर्णय घेतलेला नाही. २०२३ च्या अर्थसंकल्पामध्येही काही तरतूद नाही. याबाबत कोल्हापूरच्या भविष्यनिर्वाह निधीकडूनही काहीच मार्गदर्शन केले जात नाही किंवा लेखी काही दिले जात नाही. त्यामुळे आता निर्णायक पाऊल उचलण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी संघटनेचे सहनिमंत्रक अतुल दिघे म्हणाले, देशभरात ७२ लाख तर कोल्हापूर जिल्ह्यात १ लाख ४० हजार पेन्शनधारक संघटनेचे सभासद असून आपल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार न करणाऱ्या भाजपच्या कोणत्याही उमेदवाराला यापुढच्या काळात मतदान करायचे नाही, असा निर्धार आपण करूया.
यावेळी संघटना सचिव अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, सुनील बारवाडे, गोपाळ पाटील यांनी मार्गदर्शन केले.