विशाळगडावर कोणताही सण, उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:57 IST2025-06-07T12:57:28+5:302025-06-07T12:57:58+5:30

कोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किल्ले विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन ...

No festival or celebration will be celebrated at Vishalgad, Kolhapur Superintendent of Police informed | विशाळगडावर कोणताही सण, उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

विशाळगडावर कोणताही सण, उत्सव साजरा होणार नाही, कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती

कोल्हापूर : कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी किल्ले विशाळगडावर कोणताही सण आणि उत्सव साजरा होणार नाही. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन पोलिसांकडून काटेकोरपणे केले जाणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त विशाळगडावर तैनात केला आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.

गतवर्षी किल्ले विशाळगडावर (ता. शाहूवाडी) अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आंदोलन झाले होते. गजापूर परिसरात तोडफोड झाली होती. न्यायालयाने गडावरील उरुसाला परवानगी दिल्यानंतर उत्सवाची तयारी सुरू झाली होती. मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन गडावर कोणताही सण, उत्सव साजरा करू देणार नाही, अशा इशारा देत जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिस प्रमुख गुप्ता यांनी गुरुवारी विशाळगडला भेट देऊन पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले, विशाळगड प्रकरणी गेल्या चार दिवसांपूर्वी न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात काही अटी आणि नियम घालून दिल्या आहेत. त्यानुसार काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. गुरुवारी विशाळगड सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची बैठक झाली. त्यात सर्व विभागांचे अधिकारी होते. त्यात झालेल्या निर्णयानुसार कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय झाला आहे.

हिंदुत्वाद्यांची बैठक

हिंदुत्ववादी संघटनांची जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात गुरुवारी बैठक झाली. त्या वेळी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी संघटनेला दिली. जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनी पालन करावे, असे त्यांनी सांगितले. त्या वेळी सकल हिंदू समाजाचे बंडा साळुंखे म्हणाले, सर्व धर्मांनी कायद्यांच्या चौकटीत राहूनच सण, उत्सव साजरे करावेत. प्रत्येकाने कायद्याचा सन्मान करावा.

Web Title: No festival or celebration will be celebrated at Vishalgad, Kolhapur Superintendent of Police informed