Kolhapur- निवारा ट्रस्ट फसवणूक: अखेर भरत गाट स्वत:हून पोलिसात हजर, मुख्य सूत्रधार पूजा भोसले-जोशी अद्याप मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 16:54 IST2025-01-28T16:53:33+5:302025-01-28T16:54:03+5:30
निवारा ट्रस्टवर पुण्यातही गुन्हा

Kolhapur- निवारा ट्रस्ट फसवणूक: अखेर भरत गाट स्वत:हून पोलिसात हजर, मुख्य सूत्रधार पूजा भोसले-जोशी अद्याप मोकाट
कोल्हापूर : साडेचार ते सहा हजार रुपयांची ठेव पावती करून १८ महिन्यांत २६ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवणाऱ्या निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टचा वकील भरत श्रीपाल गाट (वय ५२, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले) हा अखेर स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, त्याची बुधवारपर्यंत (दि. २९) पोलिस कोठडीत रवानगी झाली आहे.
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पूजा अजित भोसले-जोशी (रा. राजारामपुरी तिसरी गल्ली, कोल्हापूर) आणि राहुल रमेश भोसले (रा. उचगाव, ता. करवीर) हे दोघे अद्याप पसार आहेत. लोकमतने हे फसवणुकीचे प्रकरण उघडकीस आणले व त्याचा पाठपुरावा केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्यात मे २०२३ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच निवारा ट्रस्टचे प्रमुख गायब झाले होते. शोध घेऊनही ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. तीन संशयितांपैकी ॲड. भरत गाट याने सुरुवातीला दोन वेळा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ते दोन्ही अर्ज फेटाळल्यानंतर त्याने दोन वेळा उच्च न्यायालयात दाद मागितली. तिथेही दिलासा मिळाला नाही. अखेर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
मात्र, सर्वोच्च न्यायालयानेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने तो शनिवारी (दि. २५) स्वत:हून शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर झाला. पावणेदोन वर्षे पसार असलेल्या संशयितास पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक पल्लवी यादव अधिक तपास करीत आहेत.
पूजा भोसले-जोशी गायब
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार पूजा भोसले-जोशी ही पोलिसांना चकमा देऊन गायब झाली आहे. राजारामपुरी आणि पुणे येथील तिच्या घरी जाऊन पोलिसांनी शोध घेतला. मात्र, अद्याप ती पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिच्या अटकेसाठी शोधमोहीम राबवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सर्वांनाच गंडा
पूजा भोसले-जोशी हिने या गुन्ह्यात गुंतवणूकदारांसह एजंट, ट्रस्टचे कर्मचारी, कायदेशीर सल्लागार, आयडीबीआय बँक अशा सर्वांनाच गंडा घातल्याचे तपासात समोर आले आहे. तिच्या अटकेनंतर फसवणुकीचा आकडा स्पष्ट होईल.
- तिघा संशयितांपैकी एकास अटक
- सुमारे दीडशे जणांची फसवणूक
- निवारा ट्रस्टवर पुण्यातही गुन्हा
- रखडलेल्या तपासाला पुन्हा गती
- तक्रारदारांच्या आशा पल्लवित