Kolhapur: शेतात नवजात अर्भक पुरल्याचे आढळले, तळंदगे गावात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:58 IST2025-08-09T12:57:52+5:302025-08-09T12:58:04+5:30
अर्भक अनैतिक संबंधातून किंवा लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय

Kolhapur: शेतात नवजात अर्भक पुरल्याचे आढळले, तळंदगे गावात उडाली खळबळ
पट्टणकोडोली : तळंदगे येथे धोंडीबा फडतारे यांच्या उसाच्या शेतात नवजात अर्भक पुरल्याचे आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे.
धोंडीबा फडतारे हे आपल्या शेतात सकाळी गेल्यावर त्यांना शेतामध्ये खड्डा खणलेला आढळून आला. त्याचबरोबर त्यांना मिठाची पिशवी व इतर संशयास्पद साहित्य आढळून आल्यानंतर त्यांनी याबाबत गावचे पोलिस पाटील यांना ही माहिती दिली. त्यानुसार हुपरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एन. आर. चौखंडे, उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, अपर तहसीलदार महेश खिलारे व वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट दिली.
त्यावेळी साधारणतः दोन ते अडीच महिन्यांचे अर्भक पुरल्याचे आढळून आले. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून हे अर्भक अनैतिक संबंधातून किंवा लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.