नगराध्यक्षपद खुले, वडगावात हाय व्होल्टेज लढाई; कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 18:45 IST2025-10-07T18:44:57+5:302025-10-07T18:45:15+5:30
डाॅ. अशोक चौगुले यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता

नगराध्यक्षपद खुले, वडगावात हाय व्होल्टेज लढाई; कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू
पेठवडगाव : आरक्षण सोडतीमध्ये नगराध्यक्षपद (खुले) सर्वसाधारण निश्चित झाल्यामुळे वडगावच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे. यंदा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी थेट लढत होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. यादव पॅनल आणि युवक क्रांती आघाडी यांच्यात जोरदार सामना रंगण्याची चिन्हे आहेत. आरक्षणाची सोडत निघताच पेठवडगावात कार्यकर्त्यात सोशल वॉर सुरू झाले आहे.
यादव पॅनलकडून उमेदवारीसाठी विद्या पोळ यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर ‘विद्याताईच नगराध्यक्षा’ अशा पोस्ट व्हायरल करण्यास सुरुवात झाली आहे. युवक क्रांती आघाडीकडून प्रविता सालपे यांचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. युवक क्रांतीचे रंगराव पाटील बावडेकर, अजय थोरात, पुन्हा सोबत आलेले मोहनलाल माळी यांची भूमिका काय राहणार हे महत्त्वाचे आहे. दोन्ही गटांमधील कार्यकर्ते सोशल मीडियावर आणि जनसंपर्कातून आपापल्या उमेदवारांचे समर्थन करत आहेत.
मागील निवडणुकीत नगराध्यक्षपद इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी (ओबीसी) आरक्षित होते. त्यावेळी झालेल्या तिरंगी लढतीत युवक क्रांती आघाडीने विजय मिळवला होता. वडगावात पक्षीय चौकटीपेक्षा स्थानिक स्तरावरील गटबाजी व वैयक्तीक संपर्कावर निवडणुकीचे समीकरण अवलंबून असते.
दरम्यान, डाॅ. अशोक चौगुले यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. त्यांच्या गटाची ताकद मर्यादित आहे. तरी ते उमेदवार असणार की, कोणत्या पॅनलच्या बाजूने की, पक्षीय पातळीवर उभे राहतात, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. आता प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर उमेदवारीचे समीकरण कसे बसते. यावर पुढील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.