कोल्हापुरात चिकन, अंड्यांच्या दराचा नवा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:58 IST2021-02-05T06:58:14+5:302021-02-05T06:58:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर: पोल्ट्रीधारक आणि ग्राहकांच लूट थांबविण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढे येत चिकन, अंड्याच्या खरेदी-विक्री दराचा नवा ...

New formula for chicken and egg prices in Kolhapur | कोल्हापुरात चिकन, अंड्यांच्या दराचा नवा फॉर्म्युला

कोल्हापुरात चिकन, अंड्यांच्या दराचा नवा फॉर्म्युला

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर: पोल्ट्रीधारक आणि ग्राहकांच लूट थांबविण्यासाठी आता पशुसंवर्धन विभागाने पुढे येत चिकन, अंड्याच्या खरेदी-विक्री दराचा नवा फॉर्म्युला निश्चित करण्याचे ठरवले आहे. येत्या काही दिवसांत विक्रेते व पोल्ट्रीधारकांची एकत्रित बैठकही होणार आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी दिली.

बर्ड फ्लूच्या भीतीने कोल्हापुरात चिकन, अंड्याचे दर कोसळले आहेत. पोल्ट्रीधारकांकडून खरेदी केले जाणारे दर कमी झाले आहेत, पण ग्राहकांना मात्र चढ्याच भावाने खरेदी करावे लागत आहे. पोल्ट्रीधारकांचे प्रचंड नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी कोल्हापुरात अंडी उबवणी केंद्रात पोल्ट्रीधारक व पशुसंवर्धन विभागाची विशेष कार्यशाळा झाली. त्यात चिकन, अंडी खाण्याविषयीचे गैरसमज दूर करण्याबरोबरच पोल्ट्रीधारकांचे प्रश्न साेडविण्यासाठी दर निश्चितीचा नवा पर्याय पुढे आला.

याविषयी बोलताना पशुसंवर्धन उपायुक्त वाय. ए. पठाण यांनी जिल्ह्यात बर्ड फ्लू अजिबात नाही, पण चिकन विक्रेत्यांकडून दर पाडून जिवंत पक्षी खरेदी केले जात आहेत. ग्राहकांना मात्र चढ्या दरानेच विकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळेच हा दर निश्चित करण्याचे नियोजन सुरू केल्याचे सांगितले. यासाठी जिल्ह्यातील सर्व पोल्ट्रीधारक, चिकन विक्रेते यांची एकत्रित बैठक घेऊन किरकोळ व घाऊक विक्रीचे दर काय असावेत हे ठरवले जाणार आहे. ग्राहकालाही रास्त किमतीत चिकन, अंडी मिळावीत व पोल्ट्रीचा व्यवसाय करणाऱ्यांनाही चार पैसे राहावते, दलाली कमी व्हावी हा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे पठाण यांनी स्पष्ट केले.

बैठकीत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, डॉ. सुरेश भरते, डॉ. ए. एस.नाईक, डॉ. सॅम रॉड्रीक यांनीही मार्गदर्शन केले. बर्ड फ्लूची भीती अजिबात बाळगू नका, असे आवाहनही या सर्वांनी केले.

चौकट ०१

बर्ड फ्लूच्या धास्तीने अडीच किलोच्या एका कोंबडीचा दर ४० रुपये झाला आहे. ७५ रुपयांचे खाद्य घालून ४० दिवस तिची जोपासना करून ४० रुपयेच हातात पडत असल्याने पोल्ट्रीधारकांचे रोज लाखोंचे नुकसान होत आहे याकडे लक्ष वेधले. जिवंत पक्षी खरेदी करण्याचा आणि प्रत्यक्ष चिकन अंडी विकण्यातील दरातील तफावतच पोल्ट्रीधारकांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे. साधारणपणे दुप्पट नफा गृहीत धरून दर असणे गरजेचे असताना पोल्ट्रीधारकांपेक्षा चार ते पाच पट नफा विक्रेते कमावत असल्याचे दिसत आहे.

Web Title: New formula for chicken and egg prices in Kolhapur