‘महालक्ष्मी मंदिर’मध्ये नवे चेहरे

By Admin | Updated: August 28, 2015 00:53 IST2015-08-28T00:53:29+5:302015-08-28T00:53:29+5:30

संमिश्र लोकवस्ती : महिलांच्या प्रभागात पुरुषांकडून सूत्रे हलणार

New faces in 'Mahalaxmi temple' | ‘महालक्ष्मी मंदिर’मध्ये नवे चेहरे

‘महालक्ष्मी मंदिर’मध्ये नवे चेहरे

इंदुमती गणेश- कोल्हापूर
कोल्हापूर शहराची धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेची खरी ओळख असलेल्या महालक्ष्मी मंदिर या ३३ क्रमांकाच्या प्रभागात यंदा नव्या-जुन्या महिला उमेदवारांमध्ये लढत होणार आहेत. हा प्रभाग ‘सर्वसाधारण महिला’ आरक्षित असून, तेथून विद्यमान नगरसेविका प्रभा टिपुगडे, नगरसेवक आदिल फरास यांच्या आई हसीना फरास, आर. डी. पाटील यांची कन्या श्रुती पाटील, टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांची मुलगी स्वरूपा पोवार यांच्यात लढत होणार आहे.
‘कोल्हापूर शहराचा चेहरा’ म्हणून महालक्ष्मी मंदिर या प्रभागाचे वर्णन करावे लागेल. येथे रणजित परमार हे विद्यमान नगरसेवक असून हा प्रभाग आता ‘सर्वसाधारण महिले’साठी आरक्षित झाला आहे. देशभरातील भाविक ज्या अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात, त्या या परिसरात खड्डेमय रस्ते, भाविकांना स्वच्छतागृहांसारख्या मूलभूत सोयीसुविधांचा अभाव अशा समस्या आहेत, ज्या अद्याप सुटलेल्या नाहीत. रहिवासी, व्यापारी,
बाजारपेठ अशी संमिश्र लोकवस्ती येथे आहे.
या प्रभागातून भाजपच्या विद्यमान नगरसेविका प्रभा टिपुगडे यांचे नाव चर्चेत आहे. टिपुगडे या सध्याच्या सभागृहातील भाजपच्या एकमेव महिला सदस्य आहेत. त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर शिवसेना त्यांना रिंगणात उतरविण्याच्या तयारीत आहे. या प्रभागातून नगरसेवक आर. डी. पाटील यांची कन्या श्रुती पाटील पहिल्यांदाच निवडणूक लढविणार आहे. आर. डी. पाटील हे गेल्या २५ वर्षांपासून महापालिकेत प्रतिनिधित्व करीत आहेत. श्रुती २३ वर्षांची असून, तिने इंग्लंडमधील न्यू कॅसल येथे बी. ई. इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले आहे. ती भाजपकडून निवडणूक लढविणार आहे. तिच्यावतीने सध्या आर. डी. पाटील यांचे कार्यकर्तेच प्रचार करीत असून, कोल्हापुरात आल्यानंतर ती स्वत: यात उतरेल.
या प्रभागातून विद्यमान नगरसेवक आदिल फरास यांच्या मातोश्री हसीना बाबू फरास या निवडणूक लढविणार आहे. पती बाबू फरास यांनी १९७८ साली महापालिकेत पहिल्यांदा प्रतिनिधित्व केले होते. त्यांच्या चार निवडणुका आणि मुलगा आदिल फरास यांच्या तीन निवडणुकांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. महिलांचे संघटन, संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजना अशा विविध योजनांचा लाभ त्यांनी
प्रभागातील नागरिकांना मिळवून दिला आहे.
टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवासराव साळोखे यांची कन्या स्वरूपा रविराज पोवार याही पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. स्वरूपा या उच्चशिक्षित असून, त्याही वडिलांसोबत शहरातील विविध प्रश्नांवर लढा देत आहेत. याशिवाय त्यांनी महिलांचे संघटन केले आहे. याशिवाय बालगोपाल तालीम मंडळाचे ज्येष्ठ फुटबॉलपटू राजू साठे यांच्या पत्नी माधुरी साठे यांनीही आपली उमेदवारी जाहीर केली आहे. तालीम मंडळाच्या माध्यमातून ते समाजकार्यात सक्रिय आहेत.

Web Title: New faces in 'Mahalaxmi temple'