नवे कृषी कायदे शेतकऱ्यांविरूद्धचा कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:25 IST2021-01-20T04:25:00+5:302021-01-20T04:25:00+5:30

संविधान जागर व्याख्यानमाला (फोटो) लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : केंद्र सरकारने लागू केलेले नवे कृषी कायदे हा शेतकऱ्यांविरूद्धचा कट ...

New agricultural laws plot against farmers | नवे कृषी कायदे शेतकऱ्यांविरूद्धचा कट

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांविरूद्धचा कट

संविधान जागर व्याख्यानमाला

(फोटो)

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : केंद्र सरकारने लागू केलेले नवे कृषी कायदे हा शेतकऱ्यांविरूद्धचा कट आहे. तो आम्ही शेतकरी कदापि यशस्वी होऊ देणार नाही, असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

येथील आंतरभारती विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, मनोरंजन मंडळ यांच्यासह अन्य काही संस्थांच्यावतीने आयोजित संविधान जागर व्याख्यानमालेत त्यांची मुलाखत डॉ. महावीर अक्कोळे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

शेट्टी म्हणाले, भारतीय संविधानाने नागरिकाला दिलेल्या न्याय मिळण्याच्या हक्काविरूद्ध हा कायदा आहे. भीक नव्हे, तर घामाचा दाम मागणाऱ्या आणि संकटे झेलत शेतीची संस्कृती जपणाऱ्या शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून शेतीचा धंदा करू पाहणाऱ्या अंबानी व अदानी यांच्यासाठी केलेला हा कायदा सर्व जनतेने नाकारावा आणि सध्या सुरू असलेले आंदोलन यशस्वी करावे. या आंदोलनात न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नव्हती. आम्ही शेतकरी न्यायालयात गेलो नव्हतो.

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हमीभाव ठरविताना शेतकऱ्यांची शेतीतील मूलभूत गुंतवणूक, त्याच्या कुटुंबाचे श्रम, पीक घेताना होणारा खर्च आणि त्यावर आवश्यक नफा या सर्वांचा विचार करून सरकारने हमीभाव दिला पाहिजे, अशी प्रमुख मागणी देशातील शेतकरी संघटना करीत आहेत. याचा कसलाही विचार न करता जे शेतकऱ्यांनी कधी मागितलेच नाही, असे कायदे केंद्र सरकारने शेतकऱ्यांवर लादले आहेत, असे शेट्टी यांनी सांगितले.

विनायक चव्हाण यांनी स्वागत व सुनील स्वामी यांनी प्रास्ताविक केले. संजय रेंदाळकर यांनी परिचय करून दिला. यावेळी शहर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन विभावरी नकाते यांनी केले. एम. डी. पाटील यांनी आभार मानले.

(फोटो ओळी) १९०१२०२१-आयसीएच-०२ इचलकरंजीत संविधान जागर व्याख्यानमालेत माजी खासदार राजू शेट्टी यांची मुलाखत डॉ. महावीर अक्कोळे यांनी घेतली.

Web Title: New agricultural laws plot against farmers