Kolhapur- शिक्षणाचा परीघ: रोजगाराभिमुख शिक्षणाची गरज, नोकरीप्रमाणे शिक्षणासाठीही मोठ्या शहरांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 16:21 IST2025-02-01T16:21:06+5:302025-02-01T16:21:47+5:30
शाळांमुळे मुलींना शिक्षणाची संधी

संग्रहित छाया
शीतल सदाशिव मोरे
आजरा : आजरा तालुक्याचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे. मात्र विद्यार्थी संख्या कमी होत असल्यामुळे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तुकड्या गेल्या दोन वर्षात बंद पडत आहेत. पारंपारिक शिक्षणाबरोबर तालुक्यात वैद्यकीय व इंजिनिअरिंगची सोय नसल्याने नोकरीप्रमाणे शिक्षणासाठीही मोठ्या शहरांकडे विद्यार्थ्यांचा लोंढा वाढला आहे. कौशल्यावर आधारित व रोजगाराभिमुख शिक्षणाची सध्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना गरज आहे. डोंगराळ व मागास तालुक्यात शाळा सुरू झाल्यामुळे मुलींना शिक्षणाची संधी मिळाली आहे.
जैवविविधतेने नटलेल्या आजरा तालुक्यात अद्यापही आधुनिक शिक्षणाची दारे खुली झालेली नाहीत. ५० वर्षांपूर्वी कला, वाणिज्य, विज्ञान व हायस्कूल सुरू करण्यात अमृतकाका देसाई, काशिनाथअण्णा चराटी, माधवराव देशपांडे व त्यांच्या सहकार्यांमुळे मुलींना शिक्षण मिळण्यास सुरुवात झाली. आजही सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या ६५ टक्के आहे.
रियाज शमनजी यांच्या माध्यमातून डी फार्मसी, बी फार्मसी, बीएससी अॅग्री, बापूसाहेब सरदेसाई यांच्यामुळे खाजगी आयटीआय, ज्योतिबा केसरकर यांच्या माध्यमातून ओम पॅरामेडिकलचे विविध कोर्सेसमधून विद्यार्थ्यांच्या हाताला रोजगार मिळण्याचे शिक्षण दिले जात आहे. आजरा महाविद्यालयातील बी.सी.ए., कॉम्प्युटर सायन्स, व्यावसायिक विभागामुळेही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळत आहे. इंग्रजी शाळांमुळे जि.प.च्या मराठी शाळांवर थोडा परिणाम झाला होता. मात्र सध्या जि. प. शाळांचा दर्जा उंचावला आहे.
दृष्टिक्षेपात शैक्षणिक सोय
- जि. प. प्राथमीक शाळा - ११९
- अनुदानित माध्यमिक शाळा - २९
- विनाअनुदानित माध्यमिक शाळा - ०२
- खाजगी अनुदानित शाळा - ०५
- खाजगी विनाअनुदानित शाळा - ०५
- उच्च माध्यमिक शाळा - ०६
- वरिष्ठ महाविद्यालय - ०३
- शासकीय आयटीआय - ०१
- खाजगी आयटीआय - ०१
- ओम पॅरामेडिकल - ०१
- डी फार्मसी - ०१
- बी फार्मसी - ०१
- बीएससी अॅग्री - ०१
- योग व पंचकर्म विद्यालय - ०१ ( प्रस्तावित)
- पहिली ते पदवीपर्यंत विद्यार्थी संख्या - १६१७४
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून काही रोजगार
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रमांमधूनही काही मुलांच्या हातांना रोजगार मिळाला आहे. उत्तूरमध्ये योगा व पंचकर्म विद्यालय शासनामार्फत सुरू होणार असल्याने त्याचाही भविष्यात लाभ होणार आहे. कृषी पर्यटन व जैवविविधतेसंदर्भात शिक्षणाची सध्या गरज आहे.
५० वर्षांपूर्वी तालुक्यात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे मुलींना शिक्षण मिळत नव्हते. मात्र आजरा महाल शिक्षण मंडळ व जनता एज्युकेशन सोसायटीमुळे मुलींना शिक्षण मिळू लागले व सध्या एकूण पटाच्या ६५ टक्के मुली शिक्षण घेत आहेत. स्थलांतरितांचे प्रमाण वाढल्यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे. अपुऱ्या विद्यार्थी संख्येचा तुकड्यांवर परिणाम होत आहे. पारंपारिक शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण दिल्यास त्यांना रोजगाराची संधी मिळू शकेल. कौशल्यावर आधारित शिक्षण ( एनईपी२०२० ) देत असताना त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्याची गरज आहे. पारंपरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनाच कौशल्यावर आधारित शिक्षण देणे शक्य नाही. शिक्षणाचे खाजगीकरणाऐवजी सरकारी शाळांमधूनच योग्य व दर्जेदार शिक्षण दिल्यास तरुणांच्या हाताला रोजगार मिळेल. - प्राचार्य प्रो. डॉ. अशोक सादळे - आजरा महाविद्यालय आजरा.