Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 18:56 IST2022-04-21T18:54:34+5:302022-04-21T18:56:00+5:30
शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला.

Jayant Patil: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीचीच शाळा
कोल्हापूर : राष्ट्रवादीची परिवार संवाद यात्रा राज्यभर फिरून आता कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरात या यात्रेचा समारोप होणार आहे. शहरातील तपोवन मैदानात सायंकाळी ५ वाजता संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. याआधीच कोल्हापुरात दाखल झालेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकारिणीचीच शाळा घेतली.
जयंत पाटील यांनी हेडमास्तरची भूमिका घेत आज, गुरुवारी दुपारी शाहू स्मारक भवनमध्ये भरलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत कार्यकारिणीची चांगलीच हजेरी घेतली. खचाखच भरलेल्या सभागृहात हातात सेलनिहाय यादी घेऊन नावे वाचली आणि मोजली. यात महिला वगळता कायम निमंत्रितासह सर्व सेल नापास झाले. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीआधी पक्ष बांधणीत संख्यात्मक आणि गुणात्मक सुधारणा करून राष्ट्रवादीला नंबर एकचा पक्ष बनवा, बुथनिहाय समित्या बळकट करण्याचा प्रेमळ सल्लाही दिला.
शाहू स्मारक भवनमध्ये शहर व ग्रामीण अशा सात मतदारसंघातील कार्यकारणी, पदाधिकारी सेल यांचा आढावा घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार अरुण लाड, जयमाला गायकवाड, सुलक्षणा सलगर, आर.के. पोवार, राजीव आवळे, मेहबूब शेख, रविकांत वरपे, सुनील गव्हाणे, अनिल साळाेखे उपस्थित होते.
(छाया-आदित्य वेल्हाळ)