भावाचा बहिणीला आधार; शरद पवार आले अन् माईंचा कंठ दाटून आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 08:12 PM2022-01-18T20:12:49+5:302022-01-18T20:26:31+5:30

बंधू शरद पवार आले आणि माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले.

NCP leader Sharad pawar meet the Professor N. D. Patil's wife Saroj Mai and consoling them | भावाचा बहिणीला आधार; शरद पवार आले अन् माईंचा कंठ दाटून आला!

फोटो: नसीर अत्तार

googlenewsNext

संतोष मिठारी -

कोल्हापूर - गेली काही वर्षे प्रा. एन. डी. पाटील यांच्या तब्येतीची काळजी घेणाऱ्या त्यांच्या पत्नी सरोज (माई) तशा खंबीर दिसत होत्या. पण, बंधू शरद पवार सोमवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास रुईकर कॉलनीतील घरी आले आणि मग, मात्र माईंचा कंठ दाटून आला. बहिणीला धीर देताना पवारही भावूक झाले. काही मिनिटे दोघेही नि:शब्द झाले. या भावा-बहिणीच्या आसपास असलेल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही यावेळी गलबलून आले. यावेळी पवार यांनी पाटील यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी जागवत माईंसह इतरांचेही सांत्वन केले.

पाटील कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांची निवासस्थानी रीघ लागली. येणाऱ्या प्रत्येकाशी माई धैर्याने संवाद साधत होत्या. सायंकाळी ज्येष्ठ नेते पवार आले. त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम आदी होते. बंधू पवार यांना पाहिल्यानंतर माईंना गहिवरून आले. त्यांचा आवाज जड झाला. त्यांना पवार यांनी धीर दिला. काहीवेळ ते शांत बसले. उपस्थित सर्वजण भावूक झाले. त्यानंतर माईंनी प्रा. पाटील यांची रुग्णालयातील गेल्या आठवड्याभरातील माहिती दिली. प्रा. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा संवाद सुरू झाला. ‘तुम्हाला हाताला धरून घडविणारे मार्गदर्शक हरपले’ असा उल्लेख पवार यांनी ‘रयत’चे अध्यक्ष अनिल पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांकडे पाहत केला.

या पदाधिकाऱ्यांनीही प्रा. पाटील यांच्या काही आठवणी सांगितल्या. डॉ. रा. कृ. कणबरकर यांना शाहू पुरस्कार वितरणावेळच्या प्रा. पाटील यांच्या भाषणाची आठवण पवार यांनी सांगितली. त्यानंतर पवार त्यांनी अंत्यदर्शन आणि संस्काराच्या नियोजनाची माहिती मंत्री मुश्रीफ आणि मंत्री पाटील यांच्याकडून घेतली. कोरोनाबाबतचे नियम पाळून सर्व विधी करण्याची सूचना पवार यांनी केली आणि ते पावणेसहाच्या सुमारास हॉटेल पंचशीलकडे रवाना झाले.

यावेळी माईंचे बंधू प्रतापराव पवार, बहीण मीना जगधने, आमदार पी. एन. पाटील, उद्योगपती व्ही. बी. पाटील, बेळगावचे प्रकाश माळी आदी उपस्थित होते.

कौटुंबिक सदस्यांची विचारपूस -
अमेरिकेतून कधी आला, अशी विचारणा पवार यांनी सुहास पाटील यांना केली. उपस्थित कौटुंबिक सदस्यांचीही त्यांनी विचारपूस केली. कोणते नातेवाईक कधी येणार, याची विचारणा करून सकाळी साडेसात वाजता शाहू कॉलेज येथे येण्यास त्यांनी उपस्थितांना सांगितले.

Web Title: NCP leader Sharad pawar meet the Professor N. D. Patil's wife Saroj Mai and consoling them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.