Kolhapur: जोतिबावर भाविकांच्या अलोट गर्दीत नगरप्रदक्षिणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:05 IST2025-08-12T17:03:44+5:302025-08-12T17:05:12+5:30
सलग १० तास अनवाणी चालत नगर प्रदक्षिणा पूर्ण

Kolhapur: जोतिबावर भाविकांच्या अलोट गर्दीत नगरप्रदक्षिणा
वाडी रत्नागिरी (जि. कोल्हापूर) : श्री जोतिबा मंदिर येथे चांगभलंच्या जयघोषात नगर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला. आज या नगर प्रदक्षिणेला रखरखत्या उन्हातही भाविकांचा उत्साह मोठा होता. श्रावण सोमवारनिमित्त जोतिबा देवाची अलंकारिक खडी सरदारी रूपात पूजा बांधण्यात आली.
जोतिबा मंदिरात सोमवारी सकाळी ९ वाजता अभिषेक व आरती करून नगर दिंडी मुख्य मंदिरातून दक्षिण दरवाजातून मार्गस्थ झाली. दिंडी गायमुख तलाव येथे आली. तेथील श्रीशैल मल्लिकार्जुन मंदिरात धार्मिक विधी झाला.
त्यानंतर दिंडी धडस खळा, नंदीवन, आंबावन, नागझरी, व्याघजाई तीर्थ तसेच अष्टतीर्थाचे दर्शन घेऊन मुरगुळा येथे आली. दिंडी पुन्हा दानेवाडीमार्गे सारकाळ, गिरोली येथील निनाई मंदिर व बारा ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती कोरल्या आहेत, त्यांचे दर्शन घेऊन पुन्हा गायमुख येथे व तेथून यमाई मंदिरात आली.
सलग १० तास अनवाणी चालत नगर प्रदक्षिणा पूर्ण
सलग १० तास अनवाणी जमिनीवर खाली न बसता, डोंगरदऱ्यातून, भजन करीत, महिला गौरीगीते गात, टाळ- मृदंगांचा गजर करत भाविकांनी मोठ्या संख्येने अखंडपणे चालत ही नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. जोतिबा डोंगर सभोवती १५ किलोमीटरचा प्रवास करत सायंकाळी ही नगर दिंडी यमाई मंदिरात आली. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नगर प्रदक्षिणेला भाविकांची उच्चांकी गर्दी झाली होती.