अपघातातील मृत आईवर केले परस्पर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 18:17 IST2020-12-10T18:15:40+5:302020-12-10T18:17:22+5:30
Crimenews, Police, Kolhapurnews करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अपघातातील मृत आईवर केले परस्पर अंत्यसंस्कार
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील एका तरुणाने अपघातात मृत्यू झालेल्या आपल्या आईवर कुणालाही माहिती न देता, परस्पर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात नीलेश रघुनाथ दळवी (वय २६, रा. उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी) याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. बाळाबाई रघुनाथ दळवी (वय ५५) असे मृत आईचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ६ डिसेंबर रोजी नीलेश दळवी हा आपल्या आईला घेऊन दुचाकीवरून कोल्हापूरकडे येत होता. त्यावेळी दुचाकीवरून त्याची आई बाळाबाई दळवी ह्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या कानास व डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली; पण पुढे दोन दिवसांत त्यांची प्रकृती अत्यवस्थ बनली. उपचारांचा खर्च मोठा असल्याने व तो गरीब परिस्थितीमुळे न परवडणारा असल्याने नीलेश दळवी याने अत्यवस्थ स्थितीत आईला घरी नेले.
त्यानंतर दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला; पण अपघातातील जखमीच्या मृत्यूची माहिती करवीर पोलीस ठाण्याला न देता मृतदेहावर परस्पर उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
याबाबत चौकशी होऊन नीलेश दळवी याच्यावर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. पुढील तपास करवीर पोलीस ठाण्याचे हे. कॉ. किरण माने करीत आहेत.