Kolhapur: बाळूमामाचे भाविक बनून आले अन् ४० हजारांची लाच घेणाऱ्याला पकडले, मुरगूडच्या नगर अभियंत्यास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 11:59 IST2026-01-20T11:59:15+5:302026-01-20T11:59:53+5:30
हुपरी येथील कामाच्या मोबादल्यात लाच

Kolhapur: बाळूमामाचे भाविक बनून आले अन् ४० हजारांची लाच घेणाऱ्याला पकडले, मुरगूडच्या नगर अभियंत्यास अटक
मुरगूड : हुपरी नगरपरिषदेंतर्गत केलेल्या कामांचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगर अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने एस. टी. स्टॅण्डवर रंगेहाथ पकडल्याची घटना मुरगूड येथे घडली. प्रदीप पांडुरंग देसाई (वय ३२, रा. मिनचे खुर्द, ता. भुदरगड) असे अटक केलेल्याचे नाव असून, तो नगरपरिषद मुरगूड येथे नगर अभियंता (स्थापत्य) या पदावर कार्यरत आहे.
या प्रकरणात ४७ वर्षीय तक्रारदाराने १९ जानेवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. यातील तक्रारदार हा काॅन्ट्रॅक्टर असून, त्याने हुपरी नगरपरिषदेंतर्गत कामे पूर्ण केली. या कामाचे सुमारे ७० लाख बिल निघणे बाकी आहे. संबंधित कामांचे एमबी रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी अभियंत्याने एकूण १ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यापूर्वी आरोपीने ५० हजार रुपये स्वीकारल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
ठेकेदाराचे एमबी रजिस्टर देसाई यांनी बदली झाल्यानंतर आपल्याबरोबरच आणले आहे. ते पूर्ण करावे, यासाठी या ठेकेदाराने वेळोवेळी देसाई यांना विनंती केली होती. पण देसाई यांनी या कामासाठी दीड लाखांची मागणी केली. तडजोडीअंती १ लाख ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते, त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार रुपये स्वीकारताना आज मुरगूड एसटी स्टॅण्डवर आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीची अंगझडती, वाहन व कार्यालयाची झडती पंचांसमक्ष घेतली असून, त्याचा मोबाईल तपासासाठी जप्त केला आहे.
या प्रकरणी मुरगूड पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत. ही सापळा कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील, प्रशांत दावणे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
स्टॅण्डवर लावला सापळा
मुरगूड नगरपरिषदेची इमारत एसटी स्टॅण्डला लागूनच आहे. देसाई यांनी आपली चारचाकी गाडी एसटी स्टॅण्डच्या रिकाम्या जागेत लावली होती. तक्रारदाराने सव्वापाचच्या सुमारास देसाई यांना आपण ४० हजार घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर देसाई स्टॅण्डवर आला. त्याने आपल्या गाडीचे दार उघडले त्यावेळी तक्रारदाराने आणलेली रक्कम गाडीत ठेवली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी छापा टाकला आणि सदरची रक्कम आणि देसाई यांना ताब्यात घेतले. तसेच चारचाकी गाडीही पोलिसांनी जप्त केली.
सर्वांनी लावला भंडारा...
मुरगूडच्या एसटी स्टॅण्डवर मोठी गर्दी होती. सापळा लावला आहे याची जाणीव आरोपीला होऊ नये, यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. सर्व कर्मचारी साध्या गणवेशात होते. शिवाय सर्वांनी आदमापूरच्या बाळूमामांचे दर्शन घेणारे भाविकच वाटावे, यासाठी कपाळ भरून भंडारा लावला होता. त्यामुळे पालिका कार्यालयातून स्टॅण्डपर्यंत चालत येताना देसाई याला कोणताच संशय आला नाही.
हुपरीमध्येही अनेक तक्रारी
देसाई हा मुरगूडला येण्याअगोदर हुपरी येथे कार्यरत होता. याठिकाणीही त्याच्याविरोधात अनेक तक्रारी व आरोप झाले होते. काही प्रकरणे पोलिस ठाण्यापर्यंत गेली होती. पण ती तडजोड करून निकालात काढल्याचे हुपरीमधील अनेक नागरिकांनी सांगितले. देसाई यांच्या कारकिर्दीत झालेल्या सर्व कामांची चौकशी करावी, अशी मागणी हुपरीतील नागरिकांनी केली आहे.