Kolhapur Crime: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून, अन् विजेचा धक्का लागल्याचा केला बनाव; पोलिसांनी पतीस घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 13:35 IST2023-01-28T13:32:48+5:302023-01-28T13:35:14+5:30
मुलगा व्हावा यासाठी अट्टाहास

Kolhapur Crime: मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून, अन् विजेचा धक्का लागल्याचा केला बनाव; पोलिसांनी पतीस घेतले ताब्यात
प्रकाश पाटील
कोपार्डे : करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अश्विनी एकनाथ पाटील (वय २८) असे या विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला आहे. अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती एकनाथ याने अश्विनीचा खून केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पती एकनाथ याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेली माहिती अशी अश्विनी व एकनाथ या दाम्पत्याला दोन मुली आहेत. मुलगा व्हावा यासाठी पती एकनाथ याचा अट्टाहास होता. यातून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. इतकच नाही तर अश्विनीचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. आज पहाटे अश्विनीचा दोरीच्या साह्याने गळा आवळून एकनाथने खून केला. यानंतर तिचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा बनाव केला.
मात्र अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी अश्विनीचा पती एकनाथ यांनीच खून केल्याची तक्रार दिल्याने करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केली. एकनाथने अश्विनीच्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याचे कबूल केल्याने हा प्रकार उघडकीस आला. करवीरचे पोलिस उपनिरीक्षक निवास पाटील यांनी याबाबत माहिती दिली.