कोल्हापूर: शहापुरात पानपट्टी चालकाचा खून, हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 12:12 IST2022-11-01T12:12:05+5:302022-11-01T12:12:37+5:30
जेवण करुन घरी परतताना झाला हल्ला

कोल्हापूर: शहापुरात पानपट्टी चालकाचा खून, हल्लेखोरांच्या तपासासाठी पथके रवाना
इचलकरंजी : येथील विठ्ठलनगर शहापूर परिसरातील एका पानपट्टी चालक युवकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. रहमान मलिक नदाफ (वय २०) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्याच्या घराजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, रहमान हा आपल्या आईसोबत विठ्ठलनगरात राहत होता. त्याने दिड महिन्यापूर्वी विठ्ठलनगर परिसरातील चौकात पानपट्टी सुरू केली आहे. त्यापूर्वी तो यंत्रमागावर मिळेल तिथे काम करत होता. सोमवारी रात्री पानपट्टी बंद करून तो आपल्या मित्रांसोबत जेवायला गेला होता. तेथून आल्यानंतर चौकात थांबून घरी जाताना मोटारसायकल वरून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी कोयत्या सारख्या धारदार शस्त्राने रहमान याच्यावर हल्ला चढवला. सपासप वार करून हल्लेखोर पसार झाले.
त्याच्या मानेवर, डोक्यात वर्मी घाव बसल्याने रहमान खाली कोसळला. आरडाओड ऐकूण परिसरातील नागरिक जमले. त्यांनी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती समजताच घटनास्थळी व रुग्णालयात अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व शिवाजीनगरचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली. हल्लेखोरांचा तपास करण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत.
शहापूर पोलिसांनी पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदनाचे काम सुरू होते. रुग्णालय परिसरात रात्री गर्दी जमली होती. अधिक तपास शहापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील करत आहेत.