कर्ज मिळवून न दिल्याने खून, कोल्हापुरातील वाशी नाका येथील संशयास्पद मृतदेहाचा उलगडा; तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 11:35 IST2025-04-09T11:34:51+5:302025-04-09T11:35:43+5:30
कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून घेतलेले ६५ हजार रुपये परत न देता कर्ज मिळवून न दिल्याने ...

कर्ज मिळवून न दिल्याने खून, कोल्हापुरातील वाशी नाका येथील संशयास्पद मृतदेहाचा उलगडा; तिघांना अटक
कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून घेतलेले ६५ हजार रुपये परत न देता कर्ज मिळवून न दिल्याने प्रकाश जयवंत दळवी (वय ४५, रा. सासनेनगर, आयटीआय हॉस्टेलमागे, कोल्हापूर) यांचा पाच जणांनी खून केल्याचे करवीर पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.
याप्रकरणी पोलिसांनी सचिन भीमराव घाटगे (वय ३२), बंडू उर्फ रोहित रामचंद्र कांबळे (२८) आणि योगेश गुंडा खोंद्रे (३१, तिघे रा. शिरोली दुमाला, ता. करवीर) यांना मंगळवारी (दि. ८) अटक केली. अजिंक्य शिवाजी शहापुरे (रा. आर. के नगर) आणि ओंकार अनिल पाटील (रा. शिरोली दुमाला) यांचा शोध सुरू आहे.
करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश दळवी याने सचिन घाटगे याला व्यवसायासाठी कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले होते. त्यासाठी प्रोसेस फी म्हणून वेळोवेळी ६५ हजार रुपये ऑनलाइन घेतले होते. मात्र, कर्ज मिळवून दिले नाही. दळवी हा जरगनगर येथील एका बीअर बारमध्ये दारू पित बसल्याची माहिती मिळताच सचिन घाटगे आणि अजिंक्य शहापुरे हे दोघे बुधवारी (दि. २) रात्री त्याला भेटायला गेले. कर्जाबद्दल विचारणा केल्यानंतर त्याने कर्ज आणि त्यासाठी घेतलेले पैसेही देणार नसल्याचे सांगितले. यावरून वाद वाढला.
दोघे त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पुईखडी येथे घेऊन गेले. तेथे बंडू कांबळे, योगेश खोंद्रे आणि ओंकार पाटील या तिघांना बोलावून घेतले. पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्याने आणि कोल्हापुरी पायताणाने बेदम मारहाण केली. पोलिसात तक्रार करेल या भीतीने रात्री उशिरा त्याला शिरोली दुमाला येथील पठार नवाच्या शेतात एका खोपीत डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याला वाशी नाका येथे आणून सोडले. याच परिसरात रात्री आठच्या सुमारास तो मृतावस्थेत आढळला होता.
वादाच्या माहितीने खुनाचा उलगडा
जरगनगर येथील एका बारमध्ये बुधवारी रात्री दळवी याचा दोघांशी वाद झाल्याची माहिती करवीर उपअधीक्षक कार्यालयातील एका कॉन्स्टेबलने करवीर पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी बारमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, संशयितांचा शोध लागला. ताब्यात घेऊन चौकशी करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
संशयितांकडून वसुलीची कामे
अटकेतील घाटगे आणि शहापुरे हे दोघे करवीर परिसरातील एका महिलेसाठी वसुलीचे काम करतात. ती खासगी सावकारी करते. या गुन्ह्यात तिचा सहभाग आहे काय, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. शहापुरे याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत.