कोल्हापुरातील आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतराचा पुन्हा घाट, दक्षिण महाराष्ट्राची राजकीय प्रतिष्ठा पणाला
By उद्धव गोडसे | Updated: July 4, 2025 17:50 IST2025-07-04T17:50:04+5:302025-07-04T17:50:32+5:30
ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा प्रयत्न

संग्रहित छाया
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पोलिस आयुक्तालय कोल्हापुरात सुरू व्हावे, ही मागणी सुरू असतानाच कोल्हापुरातील विशेष पोलिस महानिरीक्षकांचे (आयजी) कार्यालय पुण्याला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सीमा आंदोलन आणि दक्षिण महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी सुरू केलेल्या आयजी ऑफिसचा ऐतिहासिक संदर्भ पुसण्याचा हा डाव आहे. त्यामुळे हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, अशी माहिती काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी दिली.
बेळगावसह निपाणी, धारवाड, कारवार आणि सीमाभाग महाराष्ट्रात सहभागी करावा, या मागणीवरून सीमा भागात आंदोलन पेटताच तत्कालीन राज्यकर्त्यांनी कोल्हापुरात आयजी ऑफिस सुरू केले होते. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीण, अशा पाच जिल्ह्यांचा प्रशासकीय कारभार या कार्यालयातून चालतो. आंदोलनासह कायदा सुव्यवस्था राखणे आणि प्रशासकीय कामात याचा फायदा झाला.
अलीकडे कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने आयुक्तालय सुरू व्हावे, या मागणीने जोर धरला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतरित करण्याचा घाट घातला जात आहे. पुण्यातील काही आमदारांनी ही मागणी उचलून धरल्याने आयजी ऑफिस आणि गृह विभागाने तसा पत्रव्यवहार केला आहे.
मात्र, कोल्हापूरकरांनी याला जोरदार विरोध दर्शविला आहे. आयजी ऑफिस पुण्याला स्थलांतरित करण्याचा निर्णय सरकारने घेऊ नये, अन्यथा कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे.
पुण्याचा फेरा महागडा
आयजी ऑफिसचे स्थलांतर झाल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरच्या पोलिसांना पुण्याला फेऱ्या माराव्या लागतील. यात वेळ आणि पैशाचा अपव्यय होणार आहे. पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. यात आणखी भर घालण्यापेक्षा कोल्हापुरातून कामकाज चालणे योग्य असल्याचे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.