मुलाच्या रक्षाविसर्जनालाच आईने घेतला जगाचा निरोप, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 17:17 IST2026-01-24T17:16:14+5:302026-01-24T17:17:00+5:30
जन्मभर सावलीसारखी साथ देणारी आई आणि तिच्या आयुष्याचा आधार असलेला मुलगा मृत्यूनंतरही वेगळे होऊ शकले नाहीत

मुलाच्या रक्षाविसर्जनालाच आईने घेतला जगाचा निरोप, कोल्हापुरातील हृदयद्रावक घटना
गारगोटी; दारवाड (ता.भुदरगड) येथील बाळासो गणपती मोरे (वय ७०) यांचे बुधवारी (दि.२१) निधन झाले. त्यांच्या जाण्याने घरावर शोककळा पसरली होती. नातेवाईक, आप्तस्वकीय आणि गावकऱ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. घरातील सदस्य अजूनही या दुःखातून सावरत असतानाच गुरुवारी (दि.२२) त्यांच्या रक्षाविसर्जनाचा दिवस उजाडला, त्या दिवशी आई हौसाबाई गणपती मोरे (वय ८८) यांचे निधन झाले.
मुलाच्या अंत्यसंस्कारानंतर कुटुंबीय दुःख सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आईनेही या जगाचा निरोप घ्यावा, ही घटना मोरे कुटुंबीयांसाठी असह्य ठरली. आई–मुलामधील अतूट नातं, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा आणि भावनिक ओलावा या घटनेतून प्रकर्षाने समोर आला आहे.
बाळासो गणपती मोरे यांचे रक्षाविसर्जन गुरुवारी नियोजित होते.
मात्र, त्याच दिवशी आई हौसाबाई मोरे यांच्या निधनाने दु:ख अधिक गडद झाले. जन्मभर सावलीसारखी साथ देणारी आई आणि तिच्या आयुष्याचा आधार असलेला मुलगा मृत्यूनंतरही वेगळे होऊ शकले नाहीत. त्यामुळे आई व मुलाचे रक्षाविसर्जन शुक्रवारी (दि.२३) एकत्र करण्याचा हृदयद्रावक निर्णय कुटुंबीयांनी घेतला. नियतीच्या या विलक्षण आणि वेदनादायी खेळाने उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात खोल जखमा निर्माण केल्या.