दामदुप्पट योजनेचा फंडा : कर्ज काढून, दागिने विकून अनेकांनी केली गुंतवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 02:36 PM2021-11-17T14:36:15+5:302021-11-17T14:40:17+5:30

विश्वास पाटील कोल्हापूर : तीन वर्षांत रक्कम दामदुप्पट होते म्हटल्यावर अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवणूक करण्यासाठी कर्जे काढली आहेत. ...

Money doubled in three years Many took out loans to invest money in the scheme | दामदुप्पट योजनेचा फंडा : कर्ज काढून, दागिने विकून अनेकांनी केली गुंतवणूक

दामदुप्पट योजनेचा फंडा : कर्ज काढून, दागिने विकून अनेकांनी केली गुंतवणूक

googlenewsNext

विश्वास पाटील
कोल्हापूर : तीन वर्षांत रक्कम दामदुप्पट होते म्हटल्यावर अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवणूक करण्यासाठी कर्जे काढली आहेत. काहींनी दागिने विकले किंवा गहाण ठेवले आहेत. काहींनी ट्रॅक्टरसारखी वाहने विकून यामध्ये गूंतवणूक केली असून ते कामधंदा सोडून आणखी गुंतवणूकदार मिळवण्यासाठी गाव अन् गाव पालथे घालत असल्याचे अनुभव अनेकांनी सांगितले.

कमी कालावधीत जास्त परतावा मिळत असल्याने व्यावसायिक, शासकीय नोकरदार, शिक्षकांपासून ते शेतकरी, केबल ऑपरेटर, पत्रकार असे सर्वच स्तरांतील लोक सहभागी झाले आहेत. करवीर, पन्हाळा, राधानगरी, भूदरगड, गडहिंग्लज या तालुक्यांतील लोक जास्त संख्येने यामध्ये गुंतवणूकदार बनले आहे. एखाद्या छोट्या गावांतूनही दोन-दोन कोटींची गुंतवणूक झाली आहे. आता जे लोक ही चेन चालवत आहेत, त्यातील काही यापूर्वीही झालेल्या विविध कंपन्यांमध्ये लिडर होते. तिथेही लोकांची फसवणूक झाली आहे. परंतु तरीही लोक त्यांच्यावर विश्वास ठेवून गुंतवणूक करत आहेत.

धाबे दणाणले..

मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून प्रत्येक गावाच्या ग्रुपवर ‘लोकमत’मधील फसवणुकीच्या नव्या फंड्याची बातमी व्हायरल झाली. ती वाचून गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले. अनेकांनी एकमेकांना फोन करून त्याबद्दल माहिती दिली.

शाळा सोडून शिक्षक याच्याच मागे

अनेक शिक्षकांनी या योजनेत दहा ते पंंधरा लाख रुपये गुंतवणूक केली आहे. शाळा सोडून आमचे शिक्षक याच धंद्याच्या मागे लागले असल्याची प्रतिक्रिया शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी ‘लोकमत’कडे स्वत:हून व्यक्त केली. निदान या बातम्या वाचून तरी त्यांच्या डोळ्यात अंजन पडेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पार्ट्या देऊन केले जाते खूष..

या गुंतवणुकीस लोक बळी पडण्यात केला जाणारा भूलभुलय्या महत्त्वाचा आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये पार्ट्या दिल्या जातात. कोल्हापूरसह पुणे, लोणावळा, हैदराबाद अशा ठिकाणी त्यासाठीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तिथे अत्यंत रंगारंग कार्यक्रम असतो. उपस्थित राहणाऱ्यांनाही गिफ्ट दिले जाते. अशा कार्यक्रमावेळी जी मुले तिथे संयोजनासाठी असतात त्यांनाही दहा-दहा हजार रुपयांपर्यंतची रक्कम दिली जात असल्याचे सांगण्यात आले. ज्यांनी जास्त बिझनेस आणला त्यांचा सत्कार केला जातो. मोटारसायकल, स्कूटर, बुलेटपासून कारपर्यंत बक्षिसे दिली जातात.

अनुभव असेही...

१. मंगळवारी सायंकाळी करवीर तालुक्यातील गावातून एका तरुणाचा फोन आला. त्यांने पहिल्यांदा ‘लोकमत’चे मनापासून आभार मानले. तो म्हणाला की, मला गेल्या पंधरा दिवसांपासून गावातील काहीजण पैसे गुंतव म्हणून मागे लागले होते. त्यामुळे मी आज-उद्या दीड लाख रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तोपर्यंत ‘लोकमत’मधील बातमी वाचल्याने माझे डोळे खाडकन उघडले.

२.राधानगरी तालुक्यातील गावांतून एक फोन आला. त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून दहा लाखांचे कर्ज उचलण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील पाच लाख आपल्याजवळ ठेवून पाच लाख या योजनेत गुंतवायचे व त्यातील १५ हजार रुपये व्याज येईल ते हप्त्यापोटी भरायचे, असा फंडा त्यांना सूचवण्यात आला होता. ‘लोकमत’मधील बातमी वाचून त्यांनी गुंतवणुकीचा निर्णय रद्द केला.

‘लोकमत’मधील बातमी वाचूनआली चक्कर

कोल्हापूर शहरातील टेंबलाईवाडी परिसरातील तिघा भावांनी तब्बल १५ लाख रुपये गुंतवले आहेत. त्यातील एकजण सरकारी नोकरीत आहे. ‘लोकमत’मधील बातमी वाचून मंगळवारी सकाळी त्यांना चक्कर आली.

Web Title: Money doubled in three years Many took out loans to invest money in the scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.