Kolhapur Politics: चंद्रदीप झळकले, आबिटकरांना वगळले; ‘गोकुळ’वरुन महायुतीत ‘नाट्य’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 18:22 IST2025-03-31T18:21:38+5:302025-03-31T18:22:18+5:30
कोरेंनी वगळले, नरकेंनी १० कोटी मिळवले

Kolhapur Politics: चंद्रदीप झळकले, आबिटकरांना वगळले; ‘गोकुळ’वरुन महायुतीत ‘नाट्य’
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीवेळी तत्कालीन आमदार प्रकाश आबिटकर हे आपल्यासोबत यावेत, यासाठी त्यांना विनवणी करणाऱ्या नेत्यांनी चक्क आज होणाऱ्या पेट्रोल पंप उद्घाटनाच्या कार्यक्रमात त्यांचे छायाचित्रच वगळले आहे. एकीकडे आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते उद्घाटन करताना त्यांचे छायाचित्र छापताना आबिटकर यांचे नाव मात्र पालकमंत्री असूनही सन्मानीय उपस्थितीमध्ये खासदार, आमदार यांच्यासोबत घातले आहे. याची जोरदार चर्चा सुरू झाली असून, यानिमित्ताने आमदार विनय कोरे यांच्या पन्हाळ्यावरील कार्यक्रमाचीही चर्चा रंगली आहे.
‘गोकुळ’च्या प्रधान कार्यालयाशेजारी पेट्रोल पंप उभारण्यात आला असून, या निमंत्रण पत्रिकेत कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील आणि हार्वेस्टर मशीन हस्ते म्हणून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांची नावे पहिल्या दोन ओळीत आहेत. त्याखाली गोकुळ पेट्रोल पंप उद्घाटन हे चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून, त्या शेजारीच प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार शाहू छत्रपती यांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
तर पत्रिकेच्या तिसऱ्या पानावर खासदार, आमदार आणि माजी आमदारांची नावे सन्मानीय उपस्थितीमध्ये घालण्यात आली असून त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर पालकमंत्री आबिटकर यांचे नाव घालण्यात आले आहे. ‘गोकुळ’चे नेतृत्व आमदार सतेज पाटील आणि मुश्रीफ करतात. मुश्रीफ हे जिल्ह्यातील महायुतीचे प्रमुख नेते असताना महायुतीमधीलच पालकमंत्र्यांचे नाव सर्वात खाली आणि छायाचित्र वगळण्याची आणि यावर कहर म्हणजे महायुतीमधील आमदारांचे छायाचित्र प्रसिद्ध करायचे आणि पालकमंत्र्यांचे वगळायचे यातून कोणते नवीन राजकारण सुरू झाले आहे, याचीच चर्चा सुरू झाली आहे.
कोरेंनी वगळले, नरकेंनी १० कोटी मिळवले
‘गोकुळ’च्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनय कोरे यांनी ६ मार्च रोजी पन्हाळ्यावर घेतलेल्या कार्यक्रमाचीही चर्चा सुरू झाली आहे. पन्हाळा तालुक्यातील काही गावे आमदार चंद्रदीप नरके यांच्या मतदारसंघात येत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या शौर्यस्मारक कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नरके यांना कुठेच स्थान नव्हते.
वास्तविक हा कार्यक्रम नगरपरिषदेचा असल्याने त्यांचे नाव पत्रिकेत अपेक्षित होते. परंतु ते नसल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला वगळल्याने नरके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून पन्हाळ्यावरील शिवस्मारकासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. असे हे महायुतीमधील अंतर्गत शह, काटशह चर्चेत आले आहेत.