महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:09 IST2025-12-18T18:08:36+5:302025-12-18T18:09:03+5:30
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांनी आपली ताकद जिथे आहे, अशाच ठिकाणी उमेदवारी मागणी ...

महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांनी आपली ताकद जिथे आहे, अशाच ठिकाणी उमेदवारी मागणी करावी. तुटेपर्यंत ताणू नये, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी म्हणून जबाबदारी भाेसले यांच्याकडे आहे. त्यासाठी ते इचलकरंजीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महापालिकेच्या ६५ जागांसाठी भाजपकडे ४२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यातून भाजपवरील विश्वास दिसून येतो. माझ्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजीत आपली ताकद आहे, ती योग्य नियोजनाने वापरावी. त्यानुसार कामकाज चालणार असून, अंतिम यादीबाबत वरिष्ठ पातळीवरूनच निर्णय होईल. तरीही सक्रिय कार्यकर्त्यांची दखल घेतली जाईल. ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांना अन्य ठिकाणी संधी दिली जाईल. भाजपची सत्ता येण्यासाठी सर्वांनी ताकदीने प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार राहुल आवाडे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मकरंद देशपांडे, राजवर्धन नाईक-निंबाळकर, शशिकांत मोहिते, सुनील पाटील, शहाजी भोसले आदी उपस्थित होते.
शिवतीर्थ, शंभूतीर्थाला भेट
शिवेंद्रराजे यांनी इचलकरंजी शहरात आल्यानंतर सुरुवातीला शिवतीर्थ आणि शंभूतीर्थ येथे भेट दिली. दोन्ही ठिकाणे सुसज्ज असून, येथे भेट दिल्यानंतर अभिमान वाटतो, असे सांगितले.
निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी प्रयत्न
दोन नगरसेवक असल्यापासून भाजपसोबत असलेल्या निष्ठावंतांनाही न्याय देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. निवडून येण्याची क्षमता आहे, अशांना अन्य आवश्यक सर्व ताकद देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.
रात्री उशिरापर्यंत मुलाखती
पहिल्या दिवशी मंगळवारी ८ आणि बुधवारी ८ असे १६ प्रभागांतील मुलाखतींचे नियोजन होते. त्याप्रमाणे बुधवारी रात्री उशिरापर्यंत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. याबाबत नियोजन समितीसह वरिष्ठांच्या निर्णयानुसार उमेदवारी घोषित केली जाणार आहे.