Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 12:28 IST2025-08-23T12:26:48+5:302025-08-23T12:28:51+5:30

देशाचा नंबर वन ब्रॅन्ड होण्याची ‘गोकुळ’मध्ये क्षमता

Minister Hasan Mushrif is confident that Shoumika Mahadik will not oppose him in the Gokul meeting | Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

Kolhapur: गेल्या चार वर्षांत ‘गोकुळ’च्या संपर्क सभेला शौमिका महाडिक पहिल्यांदाच आल्या, मंत्री मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या गेल्या चार वर्षांतील कागलच्या संपर्क सभेला पहिल्यांदाच शौमिका महाडिक आल्या, कागल त्यांचे माहेर असून, संघाचा अध्यक्ष महायुतीचा आहे. त्यामुळे या सर्वसाधारण सभेत त्या फलक घेऊन येणार नाहीत तर त्या व्यासपीठावर बसतील यामध्ये शंका नाही. त्या घोषणा देणार नसल्याने सभा शांततेत होईल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

गोकुळ’च्या कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींच्या संपर्क सभेत ते बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, पहाटेपासून शेणा मुतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टावर ‘गोकुळ’ उभा राहिला असून, गुणवत्तेच्या बळावर लवकरच देशाचा नंबर वन ब्रॅन्ड होईल. ब्रँड टिकवायचा व वाढवायचा असेल तर दूध उत्पादकांचा सहभाग मोलाचा आहे. विशेषत: संचालक मंडळाची जबाबदारी मोठी आहे.

‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’च्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ झाली असून संघाचे उद्दिष्ट २५ लाख लिटर संकलन साध्य करणे आहे. शेतकऱ्यांनी संघाच्या योजनांचा लाभ घेऊन दूध उत्पादनात वाढ करावी. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, युवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले. अंबरीष घाटगे यांनी प्रास्ताविक केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.

गोव्याच्या सहलीचे कोडे

संघाचे संचालक मंडळ गोव्याला का गेले होते, याचे कोडे मलाही उलगडले नव्हते. माहिती घेतली असता ते स्वतःच्या खर्चाने गेले होते असे आढळून आले. त्यामुळे तो मुद्दा मी आता काढत नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

लाडका सुपरवायझर स्पर्धा..!

गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर यांनी अजून दूधसंकलन वाढीसाठी मेहनत करावी व संघाने प्रत्येक कार्यक्षेत्रात स्पर्धा आयोजित करून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना जातिवंत म्हैस खरेदीस प्रोत्साहित करावे, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्यांना लाडका सुपरवायझर म्हणून प्रोत्साहनपर एक लाख रुपयाचे बक्षीस संघामार्फत देण्यात यावे, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दुय्यम प्रतीच्या दुधाचे काय करता येईल?

‘गोकुळ’ची मागील निवडणूक दु्य्यम प्रतीच्या दुधाच्या मुद्द्यावर मते मागून जिंकली. त्यामुळे या दुधाचे काय करता येईल का? यावर विचार करावा, असे मंत्री मुश्रीफ यांनी सूचना केली.

Web Title: Minister Hasan Mushrif is confident that Shoumika Mahadik will not oppose him in the Gokul meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.