मंत्री हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ; शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण
By उद्धव गोडसे | Updated: October 7, 2023 16:16 IST2023-10-07T16:14:24+5:302023-10-07T16:16:20+5:30
सीए गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळला, पैसे अन्य कंपन्यांमध्ये गुंतवले

मंत्री हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ; शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे विशेष न्यायालयाचे निरीक्षण
कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून घेतलेले पैसे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अन्य कंपन्यांमध्ये गुंतवून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असे निरीक्षण ईडीच्या विशेष न्यायालयाने नोंदवले. दरम्यान, याप्रकरणी अटकेत असलेले सीए महेश गुरव यांचा जामीन अर्ज मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी (दि. ६) फेटाळला.
मंत्री मुश्रीफ यांनी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याची उभारणी करताना शेतकऱ्यांकडून काही पैसे जमवले होते. ते पैसे खासगी कंपन्यांमध्ये गुंतवले असून, त्या कंपन्यांचे संचालक मंत्री मुश्रीफ यांची मुले आहेत. मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांचे पैसे अन्य कंपन्यांमध्ये गुंतवून त्यांची फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण ईडीच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी झालेल्या सुनावणीत नोंदवले. यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात मंत्री मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
जामीन फेटाळला
या गुन्ह्यात ईडीच्या अटकेत असलेले सीए महेश गुरव यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायाधीशांनी गुरव यांचा अर्ज फेटाळला. गुरव हे कारखान्याचे लेखापरीक्षक म्हणून काम पाहत होते. मंत्री मुश्रीफ आणि त्यांच्या मुलांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती गुरव यांना होती. तेच मुश्रीफ यांच्या मुलाच्या खासगी कंपनीचे लेखापरीक्षक होते, अशी माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात दिली.