Kolhapur: ‘अमूल’ला ‘गोकुळ’ने टक्कर द्यावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:52 IST2025-01-11T13:51:07+5:302025-01-11T13:52:16+5:30
‘गोकुळ’ महाराष्ट्राचा ब्रॅन्ड करणे हीच चुयेकरांना श्रद्धांजली - सतेज पाटील

Kolhapur: ‘अमूल’ला ‘गोकुळ’ने टक्कर द्यावी, मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूरच्या म्हैस दूधाची गुणवत्ता चांगली असल्याने मुंबईच्या बाजारपेठेत ‘गोकुळ’च्या दुधाने ग्राहकांना भुरळ पाडली आहे. ते पाहून ‘अमूल’ने आमच्या कार्यक्षेत्रात घुसून म्हैस दूध संकलन सुरू केले होते. मात्र, आम्ही ते थोपवले असून देशाच्या बाजारपेठेत त्यांना टक्कर देण्यासाठी ‘गोकुळ’ने सज्ज राहावे, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
‘गोकुळ’चे शिल्पकार आनंदराव पाटील- चुयेकर यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सतेज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी मंत्री मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबीटकर, खासदार शाहू छत्रपती यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’ची उभारणी आणि विस्तारात आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके यांचे योगदान मोठे आहे. राज्यात सर्वाधिक दूध खरेदी दर देणारा ‘गोकुळ’ संघ असून सामान्य शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा आणि घामाला दाम देण्याची भूमिका आहे. मुंबई प्रमाणेच पुणे मार्केटकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर म्हणाले, गुणवत्तेच्या बळावर ‘गोकुळ’ने देशपातळीवर आपले नाव तयार केले असून अभिमान वाटेल, असा कारभार सुरू आहे. आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या प्रेरणेतून काम चालू ठेवा.
आमदार सतेज पाटील म्हणाले, जिल्हा बँकेसह ‘गोकुळ’ आम्ही राजकारण विरहित चालवत असल्याने त्यांची प्रगती नेत्रदीपक आहे. गेल्या चार वर्षांत २५०० कोटींवरून ४ हजार कोटींपर्यंत उलाढाल झाली असून याचे सगळे श्रेय दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आहे. वीस लाख लिटरचा टप्पा पार करायचाच या ईर्षेने संचालकांनी नियोजन करावे, सोलापूरला सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण होत असून ग्राहकांवर बोजा न टाकता शेतकऱ्यांना जादा दर द्यावा. ‘गोकुळ’ हा महाराष्ट्राचा ब्रॅन्ड करणे हीच आनंदराव पाटील-चुयेकर यांना खरी श्रद्धांजली असेल.
खासदार शाहू छत्रपती म्हणाले, दूध व्यवसाय हा कष्टाचा असून त्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी प्रयत्नशील राहा.
‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, गेल्या चार वर्षांत दूध उत्पादक केंद्रबिंदू मानून काम करत सर्वाधिक दूध दर दिला. विविध योजना राबवत असताना पशुखाद्याचे दर स्थिर ठेवण्याची भूमिका घेतली. ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी स्वागत केले. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर यांनी आभार मानले.
‘आयव्हीएफ’बद्दल व्यक्त केली नाराजी
संघाचा कारभार चांगला आहे; पण ‘आयव्हीएफ’मध्ये संचालकांनी चांगले काम केलेले नाही. महागड्या म्हैशी खरेदी केल्यानंतर त्या वेळेत गाभण जाऊन त्यांनी रेडीच दिली पाहिजे, यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे असून याकडे लक्ष देण्याची सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केली.
आबाजींचा ‘अमृतमहोत्सवी’ सत्कार होणार
ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांचेही ‘गोकुळ’च्या वाटचालीत योगदान असून त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त येत्या वर्षभरात सत्कार करणार आहे. शंभराव्या वाढदिवसाचा सत्कार करूया, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणताच, आबाजी शंभर वर्षांपर्यंत राहतील आमची काही गारंटी नसल्याने त्यांची हा सत्कार स्वीकारावा, असे सांगत ते ‘गोकुळ’चे ‘सा. रे. पाटील’ असल्याचे अध्यक्ष डोंगळे यांनी सांगितले.