Kolhapur: मुश्रीफ-समरजित घाटगेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा रंगली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 17:09 IST2025-12-25T17:08:37+5:302025-12-25T17:09:14+5:30
नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व घाटगे हे दहा वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून एकत्र आले

Kolhapur: मुश्रीफ-समरजित घाटगेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा रंगली
कागल : कागल नगरपरिषद निवडणुकीत एकतर्फी विजय संपादन केल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहु ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बुधवारी मुंबईत भेट घेतली. या नगरपालिका निवडणुकीत मंत्री मुश्रीफ व घाटगे हे दहा वर्षाचा राजकीय संघर्ष विसरून एकत्र आले. आम्हाला एकत्र आणण्यात एक अदृश्य शक्ती असल्याचे दोघांनी जाहीर केले होते. ही अदृष्य शक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस असल्याचे सांगितले जात होते.
नगरपालिका निवडणुकीत प्रचार सभेत या दोन्ही नेत्यांनी आमची युती घडवून आणण्यात मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुढाकार असून आमच्या युतीला भरघोस मतांनी विजयी करा. म्हणजे निकालानंतर ताट मानेने आम्ही त्यांच्या भेटीला जाऊ, असे सांगितले होते. सोमवारी सायंकाळी मंत्री मुश्रीफ नेहमीप्रमाणे मुंबईला रवाना झाले तर मंगळवारी घाटगे मुंबईला गेले आहेत. कागल नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफ - घाटगे युतीने नगराध्यक्षपदासह सर्व 23 जागा जिंकल्या आहेत. गडहिंग्लज व कागल या मोठ्या नगरपालिकात राष्ट्रवादी (अजित पवार) ची सत्ता आली आहे.
भाजपा प्रवेशाची पुन्हा चर्चा
या दोघांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एकत्रित भेट घेतली आहे. समरजित घाटगे हे भाजपामध्ये प्रवेश करणार याच्या चर्चा गेली सहा महिने सुरू असून या भेटीने पुन्हा एकदा या पक्षप्रवेशाच्या विषयाकडे लक्ष वेधले आहे.